July 24, 2024

पुणे: नरपतगिरी चौकातील मंदिरातून दानपेटी चोरीस

पुणे, ०१/०४/२०२३: सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात असलेल्या श्री साईबाबा मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी लांबविल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत दिलीप बहिरट (वय ५५, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात श्री साई सेवा प्रतिष्ठानचे मंदिर आहे. श्री रामनवमीनिमित्त मंदिरात उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या दरवाज्याचे कुलुप चोरट्यांनी तोडले. चोरट्यांनी दानपेटी चोरुन नेली.

दानपेटीत नेमकी किती रोकड होती, याबाबतची माहिती मिळाली नाही. पोलिसांकडून मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.