September 10, 2024

पुणे: दहशतवाद्यांनी वापरलेला ड्रोन सापडला, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमध्ये ५०० जीबी डाटा

पुणे, दि. ३०/०७/२०२३: पुण्यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी जंगलात रेकी करण्यासाठी वापरलेला ड्रोन राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) हाती लागला आहे. त्याच ड्रोनच्या आधारे त्यांनी जंगलासह इतर ठिकाणची रेकी केली असल्याची माहिती उघडकीस आली आहे. दरम्यान, आतापर्यंत अटक केलेल्या चौघांकडून एटीएसने ५०० जीबी डाटा जप्त केला आहे. त्यामध्ये गुगल लोकेशनचे स्क्रीनशॉट मिळाले असून, यात पुण्यासह विविध ठिकाणी रेकी केल्याचे उघडकीस आले आहे.

कोथरूड बीट मार्शलवरील कर्मचार्‍यांनी गस्तीत दुचाकी चोरीच्या संशयातून दहशतवादी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय 23), महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय-24, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा. मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना अटक केली. त्यांना आश्रय देणार्‍या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय 32, रा, कोंढवा) यालाही नुकतीच अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याच्या आरोपावरून सिमाब नसरूद्दीन काझी (वय 27, कौसरबाग, कोंढवा) मुळ. पंढेरी, रत्नागिरी) याला अटक झाली आहे.

दहशतवाद्यांकडे सापडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटची पडताळणी केल्यानंतर मोबाईल व लॅपटॉपमध्ये गुगल लोकेशनचे स्क्रीनशॉट आढळले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणे निष्पन्न झाली असून तेथील रेकी केल्यासह मुंबईतील छाबड हाऊसचा ही फोटो आढळला आहे. दहशतवाद्यांकडून जप्त केलेय ड्रोनने विविध जागेचे चित्रीकरण केले आहे. त्याशिवाय बॉम्ब बनविण्याचे सर्किट तसेच विविध प्रकारचे पुस्तक, युट्यूबवरील व्हिडीओ आणि काही पीडीएफ फाईलही दहशतवाद्यांकडे सापडल्या आहेत.