पुणे, ०९/०७/२०२३: टोमॅटोचे भाव शंभरीपार झाले आहेत. टाेमॅटाेचा भाव विचारण्यावरुन ग्राहक आणि भाजीपाला विक्रेत्यात वाद झाला. भाजी विक्रेत्याने केलेल्या मारहाणीत ग्राहक जखमी झाल्याची घटना वडगाव शेरीतील भाजी मंडईत घडली.
याबाबत गोपाल गोविंद ढेपे (वय ४२, रा. गलांडेनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भाजीपाला विक्रेता अनिल गायकवाड (रा. वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गोपाल ढेपे भाजी खरेदीसाठी वडगाव शेरीतील भाजी मंडईत गेले होते. त्यांनी भाजी विक्रेते अनिल गायकवाड याला टोमॅटोचा भाव विचारला. टोमॅटो २० रुपये पावशेर असल्याचे गायकवाडने सांगितले. टोमॅटो खूप महाग आहेत, असे ढेपे यांनी सांगितले. टोमॅटोच्या भावावरुन गायकवाड याने ढेपे यांना शिवीगाळ केली. ढेपे यांना मारहाण केली, तसेच त्यांना गाळ्यावरील वजन फेकून मारले, असे ढेपे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार नांगरे तपास करत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही