July 27, 2024

पुणे: जागतिक रेफ्रिजरेशन दिनानिमित्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पुणे, २७/०६/२०२३: आधुनिक जीवनातील विविध पैलूंमध्ये रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग तंत्रज्ञानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २६ जून रोजी जागतिक रेफ्रिजरेशन दिवस साजरा केला जातो. आजच्या काळात या तंत्रज्ञानाची सर्वाधिक गरज आहे. वातावरणातील बदलामुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत औषधे, खाद्यपदार्थ आणि इतर गोष्टी दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी या तंत्राचा वापर केला जात आहे. अन्न संरक्षण, आरोग्य सेवा, कृषी आणि इतर अनेक क्षेत्रात या तंत्रज्ञानाच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ हिटींग रेफ्रिजरेटींग अ‍ॅन्ड एअरकंडिशनिंग इंजिनिअर्स (इशरे) या संघटनेच्या वतीने “जागतिक रेफ्रिजरेशन डे” अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन उद्योगातील प्रतिष्ठित आणि तज्ज्ञ वक्त्यांकडून विविध तांत्रिक सादरीकरणे तिसऱ्या रेफ्टेक सिरीज कार्यक्रमादरम्यान आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस इशरे पुणे शाखेचे अध्यक्ष नंदकिशोर कोतकर यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. संजय फडके यांनी शीतगृहातील ऊर्जा कार्यक्षमतेबाबत तर डॉ. कुंदन कुमार यांनी सस्टनेबिलिटी रियालिटी या विषयावर सविस्तर माहिती दिली. नीरज मगनानी यांनी आयओटी आणि संवर्धित वास्तव.या विषयावर चर्चा केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरविंद सुरंगे तसेच आर पी परांजपे यांनी रेफ्रिजरेशन आपल्या जीवनावर आणि भवतालच्या वातावरणावर कसा परिणाम करतो याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला हायकॉन आणि पराग मार्केटिंग व रेफकूल इत्यादी कंपन्यांनी प्रायोजक दिले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना मानस कुलकर्णी यांनी केली तर सूत्रसंचालन महेश मोरे व देविका मुथा, प्रमोद वाजे यांनी केले. सुभाष खनाडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, कोकण इत्यादी भागातून ११० हून अधिक प्रतिनिधी आले होते.

रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन ‘रेफ्टेक’ मालिकेवर तांत्रिक कार्यक्रम आयोजित करणारा भारतातील एकमेव इशरे पुणे चॅप्टर आहे. २०२१ पासून हा उपक्रम पुण्यात सुरु आहे. इशरे पुणे चॅप्टरने यानिमित्ताने महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये किर्लोस्कर न्यूमॅटिक,अल्फा लू-वे, रेफकोन आणि पराग मार्केटिंग इत्यादी कंपनीत औद्योगिक सहल व चर्चासत्र यांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी ठरल्याप्रमाणे “क्नो युवर प्रोडक्ट” या थीम ला अनुसरून काम करण्यात आले.