October 3, 2024

पुणे: खोटा निकाहनामा बनविणार्‍याला बुलढाण्यातून अटक, चंदननगर पोलिसांची कामगिरी

पुणे, दि. ०२/०५/२०२३: खोटा निकाहनामा बसवून तो खरा असल्याचे भासवित तरुणीची बदनामी करणार्‍याला चंदननगर पोलिसांनी बुलढाण्यातून अटक केली. मागील ९ महिन्यांपासून आरोपी पसार होता. तो राहण्याचे ठिकाण आणि मोबाईल क्रमांक वारंवार बदलुन संभाजीनगर, जालना भागांत फिरत असल्याचे उघडकीस आले.

शेख खलील शेख जमील (वय-३० अमदापुर, ता-चिखली, बुलढाणा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोपी शेख खलीलने तरुणीच्या नावाचा बनावाट निकाह नामा बनवुन तो खरा असल्याचे भासविले. मुस्लीम समाजामध्ये तक्रारदार तरुणीची बदनामी केली. याप्रकरणी २४ जुलै २०२२ मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून आरोपी वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत होता. दाखल गुन्हयामध्ये आरोपी इम्रान शेख याला अटक केली होती. त्याचा साथीदार शेख खलील शेख जमील हा ९ महिन्यापासुन पसार होता. तो बुलढाण्यात असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, सचिन रणदिवे, नामदेव गडदरे यांच्या पथाकने त्याला ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी उपायुक्त शशीकांत बोराटे, एसीपी किशोर जाधव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, नामदेव गडदरे, सचिन रणदिवे, संतोष लवटे यांनी केली.