June 14, 2024

पुणे: पैसे खाली पडल्याचे दाखविले, ४० हजारांचा लॅपटॉप चोरला

पुणे, दि. ०२/०५/२०२३: मोटारीतून पैसे खाली पडल्याचे दाखवून टकटक गँगने चालकाचे लक्ष विचलित करीत गाडीतील ४० हजार ५०० रुपयांचा लॅपटॉप, कागदपत्रे असा ऐवज चोरुन नेला. ही घटना २९ एप्रिलला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जंगली महाराज रस्त्यावर घडली. यापुर्वीही अशाच पद्धतीने टकटक गँगने ८३ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १० ऑगस्टला फर्ग्युसन रस्त्यावरील हल्दीराम हॉटेल परिसरात घडली होती. त्यामुळे डेक्कन परिसरात टकटक गँगने धुडगूस घालण्यास पुन्हा सुरुवात केली आहे.

तुमचे पैसे खाली पडले आहेत, अशी बतावणी करून चोरट्याने मोटार चालकाचे लक्ष विचलित करीत ४० हजार ५०० रुपयांचा लॅपटॉप, कागदपत्रे असा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी एकाने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी वाहनचालक असून २९ एप्रिलला संध्याकाळी जंगली महाराज रस्त्यावर मोटार पार्क केली होती. त्यावेळी एकाने त्यांच्या मोटारीच्या काचेला टकटक वाजवून पैसे पडल्याचे सांगितले. त्यानुसार चालक खाली उतरुन पैसे घेत असताना, चोरट्याने गाडीतील ४० हजारांवर लॅपटॉप चोरुन नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे तपास करीत आहेत.

अशाच पद्धतीने ८३ हजारांचा घातला होता गंडा
मोटारीतून पैसे खाली पडल्याची बतावणी करून टकटक गँगने लॅपटॉप, १८ हजारांची रोकड आणि कागदपत्रे असा ८३ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १० ऑगस्टला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास फर्ग्युसन रस्त्यावरील हल्दीराम हॉटेल परिसरात घडली. विजय जगताप (वय ३० रा. ठाणे ) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.