May 18, 2024

पुणे: धायरीत फर्निचर कारखान्यात भीषण आग, जीवितहानी टळली

पुणे, १४/०३/२०२३: सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात एका फर्निचर कारखान्यात मंगळवारी सायंकाळी आग लागली. आगीत कारखान्यातील लाकडी साहित्य भस्मसात झाले. सुदैवाने आगीत कोणी जखमी झाले नाही. फर्निचर कारखान्यातील रायायनिक द्रावण असलेल्या पिंपांनी पेट घेतल्यानंतर स्फोट झाले. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात घबराट उडाली.

धायरीतील गणेशनगर भागातील कारखान्यात मंगळवारी (१४ मार्च) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर पुणे अग्निशमन दल आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग भडकली. फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यात रायायनिक द्रावण असलेले पिंप होते. आग लागल्यानंतर रासायनिक द्रावण ठेवलेल्या पिंपाचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ बंबांच्या सहायाने पाण्याचा मारा करून रात्री साडेआठच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.

आग लागल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलिसांनी कोंडी हटविण्यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

“आगीची तीव्रता भीषण होती व आजूबाजूला रहिवाशी असल्याने चारही बाजूने दहा वाहनांच्या साह्याने पाण्याचा मारा करत जवानांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा धोका टळला. घटनेत जखमी वा जिवितहानी नाही” – देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका