March 5, 2026

पुणे : नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचा पहिला टप्पा ९०% पूर्ण; संगमवाडी घाट १५ फेब्रुवारीपासून नागरिकांसाठी खुला

पुणे, २७ जानेवारी २०२६: पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संगमवाडी येथील सुमारे १.५ किलोमीटर लांबीचा सुशोभित नदी काठ तयार झाला असून, तो १५ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे.

यावेळी प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम, शहर अभियंता प्रशांत जगताप आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगमवाडी घाटाची पाहणी केली. पाहणी दरम्यान वृक्षारोपणही करण्यात आले.

१५ फेब्रुवारीपासून हा सुशोभित नदी काठ सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत नागरिकांसाठी खुला राहणार आहे. प्रकल्पाचा पुढील विस्तार संगमवाडी ते बंडगार्डन (३.७ किलोमीटर), बंडगार्डन ते मुंढवा (५.५ किलोमीटर) आणि औंध ते बालेवाडी (८.१ किलोमीटर) या भागात सुरू आहे. नदीकाठालगत उपलब्ध जागेत थीम पार्क, चालण्याचे व सायकलिंग ट्रॅक तसेच विरंगुळ्याच्या सुविधा विकसित केल्या जात आहेत.

महापालिकेच्या नियोजनानुसार मार्च २०२६ अखेर संगमवाडी ते कल्याणीनगर दरम्यान सुमारे ५ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी माहिती दिली.