May 15, 2024

पुणे: वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू

पुणे, २७/०५/२०२३: शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कात्रज घाट, नगर रस्ता, लुल्लानगर भागात अपघात झाले.

कात्रज घाटात शिवशाही बसच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहित मारुती वीर (वय २२,रा. कराड, जि. सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शिवशाही बसचालक संभाजी आत्माराम कुंभार (वय ३४, रा. कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई सचिन पवार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार रोहित वीर एाका खासगी कंपनीत नुकताच रूजू झाला होता. तो कात्रज घाटातून निघाला होता.

त्या वेळी भरधाव शिवशाही बसने दुचाकीस्वार रोहितला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या रोहितचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करत आहेत.
नगर रस्त्यावर वाडेबोल्हाई परिसरात मोटारीच्या धडकेने रिक्षातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आकाश पांडुरंग धोत्रे (वय २७, रा. कोरेगाव पार्क, गल्ली क्रमांक पाच) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत प्रवीण धोत्रे (वय २५, रा. कोरेगाव पार्क) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रवीण आणि त्याचा चुलतभाऊ आकाश नगर रस्त्याने रिक्षातून निघाले हाेते. त्या वेळी वाडेबाेल्हाई परिसरात भरधाव मोटारीने रिक्षाला धडक दिली. आकाश गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटारचालक पसार झाला असून पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. विशाल ऋषीमुनी गौड (वय २३, रा. डोमखेल वस्ती, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत चंदन गौड (वय ३५, रा. मांजरी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रकचालक पसार झाला असून पोलीस हवालदार माने तपास करत आहेत.

रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना कोंढव्यातील लुल्लानगर ते गोळीबार मैदान रस्त्यावर घडली. बाबू अनंतय्या मंगल (वय ४६, रा. लोहियानगर, गंज पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीस्वार बाबू मंगल लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे निघाले होते. त्या वेळी त्यांचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडी कठड्यावर आदळली. अपघातात मंगल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.