November 11, 2024

सीएमएस चॅम्पियन्स करंडक इलेव्हन-अ-साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत स्ट्रायकर्स एफसी संघाला विजेतेपद

पुणे, 28 मे 2023: सीएमएस(चिंचवड मल्याळी समाज) व सीएमएस फाल्कन्स फुटबॉल क्लब यांच्या वतीने सीएमएस चॅम्पियन्स करंडक इलेव्हन-अ-साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत स्ट्रायकर्स एफसी संघाने डीएफए मुंबई संघाचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. 40 वर्षावरील गटात आकतसुखी संघाने विजेतेपद पटकावले. 
 
निगडी येथील मदन लाल धिंग्रा स्टेडियमवर सुरु असलेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात स्ट्रायकर्स एफसी संघाने सुरुवातीपासूनच जोरदार चढायांना प्रारंभ केला. 24व्या मिनिटाला अमित रावतने दिलेल्या पासवर गोल करून संघाचे खाते उघडले. पिछाडीवर असलेल्या डीएफए मुंबईच्या शाहिद शेख, असद सय्यद यांनी अफलातून चाली रचल्या, पण स्ट्रायकर्स एफसीच्या बचावफळीने त्यांचे आक्रमण परतवून लावले. अखेर 45व्या मिनिटाला शाहिद शेखने चेंडूवर सुरेख ताबा मिळवत गोल करून संघाला पूर्वार्धात 1-1 अशी बरोबरी साधून दिली. 
 
उत्तरार्धातदेखील स्ट्रायकर्स एफसी संघाने आक्रमक भूमिका कायम ठेवली.  62व्या मिनिटाला डीएफए मुंबईचे खेळाडू गाफील असताना सुबोध लामाने आणखी एक गोल करून संघाला 2-1अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर डीएफए मुंबईच्या आघाडीच्या फळीने जोरदार प्रतिक्रमण केले, पण त्यांत त्यांना यश आले नाही व स्ट्रायकर्स एफसी  संघाने डीएफए मुंबई संघाविरुद्ध 2-1 असा विजय मिळवला. याच गटात 3ऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सीएमएस फाल्कन्स अ संघाने सीएमएस फाल्कन्स ब संघाचा 7-1 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला. विजयी संघाकडून शिबू सनी(45, 54मि.)याने दोन गोल, तर अनुप नायर(31मि.), अब्दुल्ला खान(37मि.), विकी राजपूत(39मि.), मनिष ठाकरे (60मि.), अनिकेत मोरे(64मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. 
 
40 वर्षावरील गटात अंतिम फेरीत आकतसुखी संघाने पुणे वेटरन्स संघाचा टायब्रेकरमध्ये 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. टायब्रेकरमध्ये आकतसुखीसंघाकडून शनूप नायर, विवेक रोकडे, प्रशांत ससाणे यांनी गोल केले, तर  पुणे वेटरन्सकडून रामनाथ विश्वनाथन, कुणाल चक्रनारायण, शैलेंद्र पाठक यांना गोल मारण्यात अपयश आले.  
 
स्पर्धेतील खुल्या गटातील विजेत्या स्ट्रायकर्स एफसी संघाला करंडक व 51,000 रुपये,  तर उपविजेत्या डीएफए मुंबई संघाला करंडक व 31,000 रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.  स्पर्धेतील 40वर्षावरील विजेत्या आकतसुखी संघाला 21,000 रुपये व करंडक, तर उपविजेत्या  पुणे वेटरन्स संघाला 11,000रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, प्रशांत शितोळे, पीसीएमसीचे माजी महापौर योगेश बेहल, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, फुटबॉल असोसिएशन ऑफ पुणेचे उपाध्यक्ष निखिल दुबोईस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरजे संग्राम खोपडे(९५ बिगएम), फुटबॉल असोसिएशन ऑफ पुणेचे सचिव सोहन सिंग सोना, गुरु तेग बहादूर फाउंडेशनचे अध्यक्ष एसएस अहलूवालिया आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
स्ट्रायकर्स एफसी:2(सुबोध लामा 24, 62मि.)वि.वि. डीएफए मुंबई: 1(शाहिद शेख 45मि.).
 
40 वर्षावरील गट: अंतिम फेरी: आकतसुखी: 3(शनूप नायर, विवेक रोकडे, प्रशांत ससाणे)(गोल चुकविला:-जेसन वाझ)टायब्रेकरमध्ये वि.वि.पुणे वेटरन्स: 0(गोल चुकविला:-रामनाथ विश्वनाथन, कुणाल चक्रनारायण, शैलेंद्र पाठक); पूर्ण वेळ: 0-0; 
 
3ऱ्या/4थ्या क्रमांकासाठी लढत: सीएमएस फाल्कन्स अ: 7 (शिबू सनी 45, 54मि., अनुप नायर 31मि., अब्दुल्ला खान 37मि., विकी राजपूत 39मि., मनिष ठाकरे 60मि., अनिकेत मोरे 64मि.)वि.वि.सीएमएस फाल्कन्स ब: 1(युवराज गुरुंग 42मि.)
 
इतर पारितोषिके: 
मालिकावीर: सुबोध लामा(स्ट्रायकर्स एफसी)
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक: बालाजी बेदाणे(स्ट्रायकर्स एफसी); 
सर्वोत्कृष्ट डिफेंडर: अब्दुल्ला खान(सीएमएस फाल्कन्स अ); 
सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक: गौरव स्वामीनाथन(अमर एफसी); 
बेस्ट फॉरवर्ड: शाहिद शेख(डीएफए मुंबई); 
40वर्षावरील सर्वोत्कृष्ट खेळाडू: प्रशांत ससाणे(आकतसुखी).