May 20, 2024

पुणे: जबरी चोरी करणार्‍या टोळीला हडपसर पोलिसांकडून अटक, जबरी चोरीसह वाहनचोरीचे ९ गुन्हे उघडकीस

पुणे, दि. २/०७/२०२३: शहरातील विविध भागात जबरी चोरी करणार्‍या टोळीला हडपसर पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ८ जबरी चोरीसह नउ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. टोळीमध्ये १० आरोपींसह ४ अल्पवयीन टोळ्यांचा समावेश आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या तपासपथकाकडून आठवड्यामध्ये ८ जबरी चो-या आणि १ वाहनचोरी असे ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. टोळीतील गुन्हेगारांना मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

मांजरी बुद्रूक परिसरात प्रभावती पोपट जावळे (वय ७४) घराजवळ २० जूनला वॉकींग करून परतत असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची मनीमाळ चोरुन नेली होती. याप्रकरणी पोलिसांनी ४५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला. अंमलदार भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे यांना संशयीत आरोपी मंगळवार पेठमध्ये राहण्यास असल्याची माहिती मिळाली. स्वप्नील ईश्वर केंदळे वय ३० रा. संभाजीनगर नेवासा याला अटक केली. त्याने अमोल भास्कर शेलार रा मुकींदपुर, नेवासा आणि पाहिजे आरोपी अमर चिरू कांबळे यांच्यासोबत हडपसर, विमानतळ हद्दीत चैनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

चोरीचे दागिने विजय रामकृष्ण देडगावकर वय ६३ रा. कोल्हार नगर याला विकल्याने त्यास गुन्ह्यात अटक केली आहे. वाहनचोरी करणार्‍या अथर्व प्रदीप शेंडगे वय १८ रा. पर्वती दर्शन आणि प्रणव शंकर ढावरे वय १८ रा. शिवतेजनगर अपर इंदिरानगर यांना अटक केली. त्यांनी २७ जूनला वडगावशेरीत एकावर कोयत्याने वार करून त्याची मोटारसायकल जबरदस्तीने चोरून नेली होती. त्यांच्याकडून २ मोबाईल मोटारसायकल, दोन अ‍ॅक्टीवा असा सव्वा दोन लाखांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.