July 27, 2024

पुणे: सावकारी रकमेवर अधिक दराने व्याज घेणारे व खंडणीची मागणी करणारे अवैध सावकार जेरबंद

पुणे, ०१/०७/२०२३: दूध डेअरी व्यवसाय तसेच नोकरदार यांच्याकडून सावकारी रकमेवर अधिक दराने व्याज घेणारे व खंडनीची मागणी करणाऱ्या अवैध सावकारांना गुन्हे शाखेच्या खंडनी विरोधी पथकाने अटक केली आहे. यश संजय मेमाणे व मानव संजय मेमाणे (दोघे राहणार -रविवार पेठ ,पुणे )असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत अशी माहिती खंडनी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली आहे.

याप्रकरणी तक्रारदार यांचा दूध डेआरीचा व्यवसाय असून त्यांनी गरजेपोटी विनापरवाना, सावकारी व्यवसाय करणारे सावकार यश मेमाणे आणि मानव मेमाणे यांच्याकडून एक लाख 90 हजार रुपये दरमहा दहा टक्के व्याजदर यांनी घेतले होते.त्याबदल्यात त्यांचा मारुती सुझुकी टेम्पो हा अवैध सावकारांकडे गहाण ठेवला होता. तक्रारदार यांनी सावकारांना गुगल पे व रोख स्वरूपात एकूण एक लाख 71 हजार रुपये व्याज देऊन स्वतःचा गहाण ठेवलेला टेम्पो परत मागितला. मात्र ,सावकारांनी तो न देता आणखीन दोन लाख रुपयांची मागणी केली. ते न दिल्यामुळे तक्रारदार यांना सावकारांनी शिवीगाळ करत, हाताने मारहाण केली तसेच त्यांचे स्मार्टवॉच काढून घेतले .त्यामुळे याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसऱ्या घटनेत, शनिवार पेठेत राहणाऱ्या एका तरुणानी होम लोन व मॉर्गेज लोनचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, विनापरवाना सावकारी व्यवसाय करणारा सावकार सुरज मनोज परदेशी (राहणार -कात्रज ,पुणे) त्याच्याकडून एकूण 45 हजार रुपये दरमहा 20 टक्के व्याजदराने घेतले होते .त्या बदल्यात तक्रारदाराने आरोपीच्या गुगल पे व फोन पे वर एकूण चार लाख रुपये ऑनलाईन आणि पन्नास हजार रुपये रोख स्वरूपात दिलेले होते.मात्र, त्यानंतरही सावकार परदेशी हा वारंवार फोन करून व भेटून शिवीगाळ करून घरी येऊन बदनामी करण्याची धमकी देत आणखी दीड लाख रुपयांची मागणी करत होता. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे.

सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे ,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, पोलिस अमलदार विजय गुरव ,सुरेंद्र जगदाळे, विनोद साळुंखे ,संग्राम शिंनगारे, राहुल उत्तेकर ,सचिन आहीवळे ,पवन भोसले ,प्रदीप गाडे ,अशा कोळेकर, किशोर बर्गे यांनी केलेली आहे.