December 14, 2024

हरित विकासासाठी आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे शहर ठरले महाराष्ट्रातील पहिले शहर

पुणे, १३ एप्रिल २०२३: इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या (आयजीबीसी) ग्रीन एक्झिस्टिंग सिटीज रेटिंग सिस्टम अंतर्गत हरित विकासासाठी दिला जाणारे प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे हे महाराष्ट्रातील पहिले, तर भारतातील दुसरे शहर बनले आहे. यापूर्वी गुजरातमधील राजकोट शहरास हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल आणि क्रेडाई पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित ‘अभिनंदन – ग्रीन पायोनियर्सचा सत्कार’ या कार्यक्रमात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते प्लॅटिनम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शहराच्या हरित विकासासाठी पाठिंबा देणाऱ्या क्रेडाई पुणे मेट्रो संघटनेलाही यावेळी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी यशदाचे महासंचालक एस चोकलिंगम, सीआयआय-आयजीबीसीचे उपकार्यकारी संचालक एम आनंद, ग्रीन फॅक्टरी रेटिंग सिस्टमचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, आयजीबीसी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष जेपी श्रॉफ, सह-अध्यक्ष पूर्वा केसकर, मुख्य समिती सदस्या प्रणती श्रॉफ, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, महासंचालक डॉ. डी के अभ्यंकर आणि महाव्यवस्थापक उर्मिला झुल्का, कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या हवेची गुणवत्ता सुधारणे, शहरी हरित पट्टा विकास,  मृदा संवर्धन, जलाशयांचे जतन, पाण्याची उपलब्धता, पर्यावरण संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन  यासह इतर विविध उपक्रमांचा अभ्यास यासाठी करण्यात आला होता.  प्रकल्पाची अंमलबजावणी आणि  त्याची शाश्वतता या संदर्भातील सर्वंकष अभ्यासानंतर महापालिकेला हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रणती श्रॉफ यांनी आयजीबीसीने विचारात घेतलेल्या घटकांबाबत माहिती दिली.

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ” हरित विकासासाठी मिळालेले हे प्रमाणपत्र म्हणजे पुणे महापालिकेच्या चांगल्या कामगिरीचे द्योतक आहे. पर्यावरणासाठी गेल्या १०-१५ वर्षात पुणे महापालिकेने अतिशय चांगले उपक्रम राबविले आहेत. शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. त्याचबरोबर कार्बन इन्वेंटरी अर्थात माहितीकोष तयार करणारी देखील ती पहिली महानगरपालिका आहे.  कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने विकेंद्रित व्यवस्थाही सुरू केली. भूजल नोंदणीही केली. गांडूळ-खत प्रकल्प, सौर उर्जा, सांडपाणी प्रक्रिया यासाठी उचललेल्या पावलांवर २० टक्के सूट देणारे पुणे हे पहिले शहर आहे. एकूणच पर्यावरण या विषयाची गांभीर्याने दखल घेत, महापालिका पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र त्याचवेळी हवामान बदल हे शहरासमोरचे सर्वात मोठे आव्हान असून, आपले पर्यावरण आणि पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहे.”

महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ” गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर हे सर्वात राहण्यायोग्य शहर ठरत आहे. हे शहर कायमच सर्वात राहण्यायोग्य शहर राहील, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. शहरात विविध पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. ही उभारणी करताना तसेच ती केल्यानंतरही पर्यावरण संवर्धनसाठी अधिक प्राधान्य दिले जाते. पर्यावरण संवर्धन आणि विकास यांमध्ये योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न महापालिकेकडून नेहमी केला जातो. आगामी काळात देखील पुणे महानगरपालिका आणि आमचे सर्व अधिकारी, कर्मचारी हे ‘सर्वात जास्त राहण्यायोग्य शहर’ हा टॅग पुण्याकडेच राहील यादृष्टीने काम करत राहणार,” असे यांनी सांगितले.

प्रदीप भार्गव म्हणाले, पुणे महानगरपालिकेला मिळालेला ‘ ग्रीन ‘ टॅग टिकवून ठेवण्यासाठी आता अधिक प्रयत्न झाले पाहिजेत. शहरातील केवळ एखादा पट्टा हरित भाग असला म्हणजे संपूर्ण शहर हरित होते असे नाही. पुणे महानगरपालिकेच्या सर्वच भागांमध्ये हरित पट्टा विकसित झाला पाहिजे. त्याठिकाणी देखील शाश्वत विकास झाला पाहिजे. यासाठी शहारातील प्रत्येक भागदारक खासकरून, औद्योगिक क्षेत्रात हरित विकासात आपले योगदान देणे आवश्यक आहे.”

जेपी श्रॉफ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्रॉफ म्हणाले,”  पुणे हे शहर हरीत शहर व्हावे, यासाठी बरीच मेहनत घेण्यात आली आहे. पुणे महापालिकेला हरित विकास साधायचा होता,  क्रेडाई पुणे मेट्रोलादेखील यासाठी पाठिंबा द्यायचा होता आणि आयजीबीसीला ते घडवायचे होते. हे प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तीन संघटनांनी दोन वर्षे एकत्रपणे काम केले आणि हे घडवून आणले. हे उद्दीष्ट साधण्यासाठी केलेल्या प्रयत्न आणि पाठिंब्यासाठी  मी पुणे महापालिका आणि क्रेडाई पुणे मेट्रोचा आभारी आहे.”

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले की, क्रेडाई पुणे मेट्रो हो संघटना हरित विकासाला नेहमीच पाठिंबा देते. ही हरित विकासाची चळवळ शाश्वत राहावी, यासाठी शहरातील विकसक हे सर्वसमावेशक रीतीने या चळवळीत योगदान देतील, अशी मी यावेळी ग्वाही देतो. मला खात्री आहे, की  महाराष्ट्रातील प्रत्येक शहर, प्रत्येक तहसील आणि प्रत्येक जिल्हा या हरित विकासाचे अनुकरण करेल आणि पुढील१० ते १५ वर्षांत राज्यातील प्रत्येक शहर, जिल्हा, गावे ही आयजीबीसीतर्फे प्रमाणित केली जातील. या हरित चळवळीला काही प्रमाणात आर्थिक नफ्याची जोड दिल्यास, ही चळवळ अधिक बळकट होऊ शकते, यासाठी ग्रीन इन्सेंटिव्ह योजना सुरू करता येतील का, याबाबत प्रशासनाने आणखी प्रयत्न करावे.”

कार्यक्रमात हरित विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या विलास जावडेकर डेव्हलपर्स, गंगोत्री होम्स, अमर बिल्डर्स, कोहिनूर ग्रुप आणि मालपाणी ग्रुप यांचा वंदना चव्हाण आणि विक्रम कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पूर्वा केसकर यांनी आभार मानले.