December 13, 2024

पुणे: आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीचे धागेदोरे दुबईपर्यंत- गुन्हे शाखेकडून नागपूर, मुंबईत तपास

पुणे, २४/०५/२०२३: आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक नुकतीच अटक केली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, आरोपींमध्ये शहरातील एका पबच्या मालकासह बड्या सट्टेबाजाचा समावेश आहे. आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीचे धागेदोरे दुबई, नागपूर, मुंबई या शहरात असल्याचे उघडकीस आले आहे.

कोंढव्यातील एका सदनिकेत छापा टाकून खंडणी विरोधी पथकाने शनिवारी रात्री वसीम हनीफ शेख (वय ३९, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द), इक्राम मकसुद मुल्ला (वय २६, रा. मदने सोसायटी, घोरपडे पेठ) आणि मुसाबिन मेहमुद बाशाइब (वय ३५, रा. सोमवार पेठ) यांना अटक केली. याप्रकरणी जितेश मेहता (रा. पुणे) आणि अक्षय तिवारी (रा. इंदूर, मध्यप्रदेश) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आरोपी जितेश मेहता हा पबमालक आहे. इंदूरमधील सट्टेबाज अक्षय तिवारी याच्याशी मेहताचे लागेबांधे आहेत. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, शंकर संपते आणि पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी शेख, मुल्ला, बाशाइब यांची मंगळवारी (२३ मे)पोलीस कोठडी संपली. त्यानंतर तिघांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती पोलिसांनी केली. न्यायालयाने तिघांच्या पोलीस कोठ़डीत वाढ करण्याचेा आदेश दिले.आरोपींनी सट्टेबाजासाठी तीन इमेल आयडीचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. इंदूरमधील सट्टेबाज तिवारी याचे बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.