July 25, 2024

पुणे: दहावी उत्तीर्ण बनावट प्रमाणपत्र, प्रकरणात मुंबईतून एकास अटक; स्वारगेट पोलिसांची कारवाई

पुणे, २४/०५/२०२३: दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीतील आणखी एकास स्वारगेट पोलिसांनी मुंबईतून अटक केली. या टोळीने अडीच हजार जणांकडून पैसे घेऊन त्यांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

संदीपकुमार शामलशंकर गुप्ता (वय ३३, रा.साईकृपा चाळ, कुर्ला, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बनावट प्रमाणपत्र प्रकरणात यापूर्वी संदीप ज्ञानदेव कांबळे (वय ३५, रा. सांगली), कृष्णा सोनाजी गिरी (वय ३४, रा. बिडकीन, जि. धाराशिव ), अल्ताफ महंमद शेख (वय ३८, रा. परांडा, जि . धाराशिव ), सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम (वय ३८, रा. संभाजीनगर ) यांना अटक केली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार कांबळे आहे. आरोपी गुप्ता याने बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला परीक्षा केंद्र आणि शाळांची माहिती पुरवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तांत्रिक तपासात गुप्ता याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबईतील कुर्ला भागातून अटक केली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, शिवदत्त गायकवाड, रमेश चव्हाण, फिरोज शेख आदींनी ही कारवाई केली.