May 5, 2024

पुणे: दागिना गहाळ झाला अन कामगार चोरांचे बिंग फुटले, ७९ लाख ३८ हजारांच्या दागिन्यांच्या अपहार प्रकरणी दोघांना अटक

पुणे, दि. २८/०४/२०२३: प्रसिध्द सराफी व्यावसायीक चंदु काका सराफ अ‍ॅण्ड सन्स दुकानातील तब्बल १ किलो २४६ ग्रॅम (७९ लाख ३८ हजारांचा) सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी दोघा कर्मचार्‍यांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांनी सोन्याच्या दागिन्यावर ४५ लाखांचे कर्ज काढल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते २६ एप्रिल २०२३ दरम्यान घडला.

कोमल अनिल केदारी (वय २४, रा. नानापेठ) आणि सागर सुर्यकांत नकाते (वय ३२, रा. ससाणेनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने १ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. व्यवस्थापक ओंकार प्रताप तिवारी (२९, रा. वृंदावन सोसायटी, चर्‍होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे) यांना फिर्याद दिली आहे.

सराफी दुकानात कोमल आणि सागर आवक जावक विभागात होते. त्यांनी संगणमत करून तब्बल ३६ दागिने लंपास केले. दुकानाच्या ऑडीटमध्ये त्यांनी दागिना प्रवासात असल्याचे भासविले होते. मात्र दागिन्यांची तपासणी करताना दागिना नसल्याचा प्रकार उघडकीस आले. सर्व दागिन्यांची तपासणी केली असता ३६ दागिने नसल्याच वास्तव समोर आले. त्यानंतर कोमल आणि सागर याच्याकडे विचारणा केल्यानंतर ते गडबडून गेले. चौकशीत त्यांनी पैशासाठी गुन्हा केल्याचे कबुल केले. सराफी दुकानातून तब्बल १ किला २४६ ग्रॅम दागिन्यांचा अपहार करत दोघांनी वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून त्यांनी कर्ज काढले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप, तपास करीत आहेत.