October 2, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: माथाडीच्या नावाखाली व्यापाऱ्याला खंडणी मागणाऱ्याला अटक

पुणे, दि. ०९/०२/२०२३: माथाडीच्या नावाखाली काच वाहतूक करीत आलेल्या टेम्पो चालकाला अडवून व्यापाऱ्याकडे  खंडणी मागणाऱ्याला खंडणी विरोधी पथक एकने अटक केली. त्याने  ८ हजार रुपये दिले नाही तर टेम्पो खाली करून देणार नाही अशी धमकी दिली होती.
माथाडी कामगार अविनाश दिलीप अडगळे वय ३२ रा. वारजे,  याच्या विरुध्द वारजे पोलीस  गुन्हा नोंद करून  ताब्यात देण्यात आले आहे.
खंडणी विरोधी पथक एकच पोलीस निरीक्षक अजय वाघमारे  यांना  वारजे माळवाडी येथील काचेच्या व्यापा-याच्या दुकानात आलेला काचेचा टेम्पो खाली करण्यासाठी खंडणी मागत असल्याबाबतची माहिती मिळाली.   त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील  यांनी पथकासह त्याठिकाणी जावुन खातरजमा केली. त्यावेळेस अविनाश अडगळे याने टेम्पो मधून माल खाली करण्याचे काम हे त्याला माथाडी संघटनेकडून भेटले असल्याचे सांगितले.  फिर्यादी यांनी त्यास माल खाली करणेसाठी किती पैसे घेणार असे विचारले असता त्याने वाराईचे  आणि खाली करण्याचे मिळून ८ हजार रुपये मागितले.
फिर्यादीने त्याला दरपत्रकाप्रमाणे रक्कम घेवून माल खाली करण्यास सांगितले. तेव्हा त्याने त्यास नकार देवून माल खाली करण्याचे ८ हजार रुपये दिले नाहीतर  माल उतरू देणार नाही , अशी धमकी दिली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त  रामनाथ पोकळे,  पोलीस उप आयुक्त  अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त  सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे  पोलीस निरीक्षक  अजय वाघमारे, एपीआय अभिजीत पाटील, उनिरीक्षक विकास जाधव पोलीस अंमलदार किरण ठवरे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, अमोल आवाड,राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, संभाजी गंगावणे यांनी केली आहे.