September 17, 2024

पुणे: जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ४ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

पुणे, दि.३/०४/२०२३ –  शहरातील विविध भागात चोरट्यांकडून जेष्ठ महिलांना लक्ष्य केले जात असून पुढे पोलिस आहेत. त्यांच्याकडून चौकशी सुरु आहे. तुमच्याकडील दागिने पिशवीत ठेवा. आम्ही ते सुखरुप तुमच्याकडे देउ, असे सांगून हातचालखीने चोरट्यांकडून पिशवीच लंपास केली जात असल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे रस्त्याने पायी जाणार्‍या जेष्ठ महिलांना घराबाहेर पडावे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

रस्त्याने पायी चाललेल्या महिलेला पोलिसाची भीती दाखवून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३ लाख ८५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास बिबवेवाडीतील लोअर इंदिरानगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी  महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला लोअर इंदिरानगर परिसरात राहायला असून २ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास त्या स्वामी समर्थ मंदीर परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेला अडवून, पुढे पोलिस  आहेत. तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा. असे बोलण्यात गुंतविले. त्यानंतर महिला गळ्यातील मंगळसूत्र काढत असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी ३ लाख ८५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव तपास करीत आहेत.