September 9, 2024

पुणे: बीट मार्शलला धक्काबुक्की करणारे तिघे अटकेत, महमंदवाडीतील घटना

पुणे, दि.०३/०४/२०२३ – संशयास्पदरित्या उभ्या केलेल्या मोटारीतील तरुणांकडे विचारपुस केली असता, रागातून त्यांनी बीट मार्शलला धक्काबुक्की करीत संपवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिघाजणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २ एप्रिलला रात्री एकच्या सुमारास महमंदवाडीतील रहेजा सोसायटीनजीक रस्त्यावर घडली.

मीतेश संजय परदेशी (वय ३२ रा. वानवडी), मनीष जयप्रकाश मेहता (वय ३६ रा. दापोली रत्नागिरी) आणि सुमीत राजेश परदेशी (वय ३६ रा. शांतीनगर, वानवडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अमलदार रोहित पाटील यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी राहूल पाटील हे २ एप्रिलला कोंढवा पोलिस ठाण्यातंर्गत उंड्री चौकीच्या हद्दीत बीट मार्शलिंग करीत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास रहेजा सोसायटीनजीक एक मोटार त्यांना संशयास्पदरित्या थांबल्याची दिसून आली. त्यामुळे राहूलने मोटारीजवळ जाउन संबंधितांकडे विचारपूस केली. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने आम्ही कोण आहोत, माहित आहे का असे म्हणत अमलदाराला धक्काबुक्की केली. त्यांना अरेरावीची भाषा करीत संपवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक चोरगल तपास करीत आहेत.