March 3, 2026

Pune: वडगावशेरी मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आमदार बापूसाहेब पठारे यांचा सभागृहात आवाज

मुंबई, २५/०२/२०२६: अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा होत असताना वडगावशेरी मतदारसंघ तसेच पुणे शहराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांचा अभिभाषणात समावेश नसल्याबद्दल आमदार बापूसाहेब पठारे यांनी खेद व्यक्त करत जनतेचे प्रश्न ठामपणे सभागृहात मांडले.

यावेळी आमदार पठारे यांनी नमूद केले की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रम, बलिदान आणि स्वराज्यनिष्ठ योगदानाचा अभिभाषणात उल्लेख नसणे खेदजनक आहे. तसेच संत तुकाराम महाराज यांचे आजोळ असलेल्या श्री क्षेत्र लोहगावचा अपेक्षित पर्यटन विकास झालेला नसून परिसरातील ऐतिहासिक ‘हरणतळे’ची दुरवस्था झाली आहे. या पवित्र स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

देहू–आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील दिघी–कळस दरम्यान संरक्षण खात्याची जमीन ताब्यात न आल्याने रस्ता रुंदीकरण रखडले असून वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ही जमीन ताब्यात घेऊन काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच वाढती लोकसंख्या, आयटी क्षेत्राचा विस्तार आणि नव्याने समाविष्ट गावांमुळे पुण्यात वाहतूक कोंडी तीव्र झाली असून अंतर्गत व बाह्य रिंगरोड प्रकल्प तातडीने सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पुणे शहरात “सखी मॉल” उभारण्याची मागणीही करण्यात आली. लोहगाव येथील “पोलीस मेगा सिटी” गृहप्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून तो तातडीने पूर्ण करावा, असेही त्यांनी नमूद केले.

“मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना” अंतर्गत वडगावशेरी मतदारसंघातील अनेक शेतरस्ते अद्याप खुले झालेले नसून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शेती व फळबाग कर्जावरील मुद्रांक शुल्क सवलतीची मर्यादा वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांसाठी शाळा व महाविद्यालय स्तरावर क्रीडा व व्यायामाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उभारण्याची आवश्यकता देखील त्यांनी मांडली.

प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत अनेक पात्र शेतकऱ्यांना सौर पंप अद्याप मिळाले नसल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच दावोस येथील गुंतवणूक करारांमधून प्रत्यक्ष रोजगार निर्मितीबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली.

नैसर्गिक शेती योजनांची अंमलबजावणी, मदत पद्धती आणि वेळापत्रकाबाबत पारदर्शक माहिती द्यावी, कृषी पंपासाठी मोफत वीज योजनेची मर्यादा ७.५ अश्वशक्तीवरून १० अश्वशक्तीपर्यंत वाढवावी तसेच सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जमीन भाडेपट्टा करार प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

वरील सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख नसल्याबद्दल आमदार बापूसाहेब पठारे यांनी सभागृहात जाहीर खेद व्यक्त करत या प्रश्नांवर शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली.