October 14, 2024

पुणे: एमपीएससी उत्तीर्ण तरूणी राजगड पायथ्याला मृतावस्थेत

पुणे, १८/०६/२०२३: एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २६ वर्षीय तरुणी राजगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या सतीचा माळ परिसरात मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. तिने आत्महत्या केली किंवा तिचा मृत्यू अन्य कोणत्या कारणामुळे झाला,या दृष्टीने पोेलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

दर्शना दत्ता पवार (वय २६) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना मूळ नगर जिल्ह्यातील कोपगागावची रहिवासी आहे. गेल्या काही वर्षांपासून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. काही दिवस ती पुण्यात तयारी करत होती. त्यानंतर ती गावी जाऊन अभ्यास करत होती. एमपीएससी परीक्षेत ती राज्यातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड झाली होती.

पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. ९ जून रोजी ती पुण्यात आली होती. सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. १२ जून रोजी ती सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे, असे मैत्रिणीला सांगून ती बाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली होती. तिच्यासोबत राहुल दत्तात्रय हांडोरे होता. १२ जूननंतर तिचा मोबाइल क्रमांक बंद झाला. तिच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला. मात्र, तिचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, दर्शनाबरोबर असलेला मित्र राहुल हांडोरे बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलीस ठाण्यात दिली. दर्शना आणि तिच्या मित्राचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला.

गूढ उकलण्यासाठी सखोल तपास सुरू
१२ जूननंतर दर्शना आणि तिचा मित्र राहुल यांचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे तांत्रिक तपासात आढळून आले. दोघे जण वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर रविवारी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ परिसरात दर्शनाचा मृतदेह सापडला. दर्शनाचे वडील दत्ता यांनी तिची ओळख पटविली. वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस कर्मचारी ओैदुंबर आडवाल, ज्ञानदीप धिवार यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने मृतदेह झुडपातून बाहेर काढला. दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून पुणे ग्रामीण, तसेच सिंहगड रस्ता, वारजे पोलिसांच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.