पुणे, २० फेब्रुवारी २०२६ – शिख धर्माचे नववे गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त आयोजित ‘हिंद दी चादर’ या भव्य कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर श्रीमती मंजुषा दीपक नागपुरे यांनी दिली. नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ४.३० वाजता पुणे महापालिकेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक पार पडली.
मानवता आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी स्वतःचे शीश अर्पण करणारे गुरू तेग बहादूरजी यांचे बलिदान इतिहासात अद्वितीय मानले जाते. त्यांच्या त्यागामुळे त्यांना ‘हिंद दी चादर’ ही उपाधी लाभली. सन २०२५ हे त्यांचे ३५० वे शहीदी शताब्दी वर्ष असल्याने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असून, खारघर येथील समागम हा त्या तील प्रमुख सोहळा ठरणार आहे.
बैठकीस गुरुनानक दरबार गुरुद्वाराचे अध्यक्ष श्री चरणजीतसिंग साहनी, पुणे राठोड समाजाच्या कविता दिलीप राठोड, असांजा पुणेचे जीत एल. चांदवाणी, बंजारा परियोजनाचे श्री रमेश चव्हाण यांच्यासह शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, महोयाल, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव (वारकरी) आदी नऊ समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बस व्यवस्था, बससोबत रुग्णवाहिका व प्रथमोपचार पेटी तसेच पीएमपीएमएलच्या बसवर जनजागृती फलक लावण्याच्या सूचना मांडण्यात आल्या.
महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांनी सर्व मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात येईल व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका पूर्ण सहकार्य करेल, या शहीदी समागमामुळे विविध समाजघटकांमध्ये ऐक्य, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होईल, असा विश्वास नागपुरे यांनी व्यक्त केला. असे स्पष्ट केले. उपमहापौर श्री परशुराम वाडेकर यांनीही शुभेच्छा देत आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
बैठकीस आरोग्यप्रमुख श्रीमती नीना बोराडे, उपायुक्त (परिमंडळ क्र. १) श्री माधव जगताप, उपायुक्त (परिमंडळ क्र. २) श्री संतोष वारुळे, उपायुक्त (परिमंडळ क्र. ४) श्री अरविंद माळी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री अविनाश सकपाळ, उपायुक्त (झोन निपुण) श्री संदीप खलाटे, मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) तुषार बाबर यांनी केले.

More Stories
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न
विमाननगरातील रामेश्वरम हॉटेलवर महापालिकेचा हातोडा; ६,५०० चौ. फूट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती