March 3, 2026

पुणे : पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्यासाठी देशव्यापी बँक संप यशस्वी

पुणे, २७ जानेवारी २०२६: देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी आज (२७ जानेवारी) युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या आह्वानावर देशव्यापी बँक संप यशस्वी पद्धतीने पार पाडला. या संपाचा उद्देश पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्याची मागणी पुर्ण करणे होता, जी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग शंभर टक्के असल्याचे नोंदवण्यात आले.

पुणे येथील स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेसमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शन करून आपली मागणी मांडली. मार्च २०२४ मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारामध्ये पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्याची मान्यता मिळाली होती, परंतु जवळपास दोन वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संपाचा मार्ग स्वीकारावा लागला, असे स्टेट बँक वर्कर्स ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस राजेश मुळे यांनी सांगितले.

राजेश मुळे म्हणाले की, बँक कर्मचाऱ्यांवर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे आणि पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू झाल्यास ते त्यांच्या कौटुंबिक व वैयक्तिक आयुष्याला वेळ देऊ शकतील. इन्शुरन्स, रिझर्व्ह बँक आणि शेअर मार्केटसह इतर वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसांचा आठवडा राबवला जात असतानाही बँकिंग क्षेत्रातील दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

केंद्र सरकारने लवकरात लवकर पाच दिवसांचा बँकिंग आठवडा अंमलात आणला नाही, तर भविष्यात आणखी तीव्र स्वरूपाच्या आंदोलन व संपांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील यावेळी मुळे यांनी दिला.