June 16, 2024

पुणे: अधिकृत पब हॉटेल कडे आधी दुर्लक्ष आणि आता कारवाईला आला जोर

पुणे, ता. २२/०५/२०२४: शहरातील रूफटॉप हॉटेल, पब, रेस्टॉरंटच्या अनधिकृत बांधकामांकडे महापालिकेने दुर्लक्ष केले होते. मात्र कल्याणीनगरमधील घटनेनंतर महापालिकेचे डोळे उघडले आहेत. त्यामुळे शहरात बुधवारी (ता. २२) कारवाईला जोर आला. तीन मोठ्या हॉटेलसह ४० ठिकाणी कारवाई करून ५४ हजार ३०० चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले.

कल्याणीनगरच्या घटनेमुळे संपूर्ण देशभर संताप व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पबमध्ये वेळेचे आणि नियमांचे उल्लंघन करून होणारी दारू विक्रीकडे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष वेधले गेले आहे. कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, मुंढवा, खराडीमध्ये अनधिकृत बांधकामे, शेड मारून अनेक हॉटेल सुरू आहेत. इमारतीच्या गच्चीवर अनधिकृतपणे रूफटॉप हॉटेल सुरू आहेत. काही इमारतींमध्ये अंतर्गत बदल करून पब सुरू आहेत. तेथे शेकडो ग्राहक रात्री दारू पिण्यासाठी जात असून त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोणत्या भागात किती अनधिकृत हॉटेल आहेत, याची माहिती महापालिकेकडे आहे. त्यांना यापूर्वी नोटिसा बजावल्या आहेत. मात्र महापालिकेचा धाक नसल्याने कारवाई करूनही पुन्हा हॉटेल सुरू केले जाते. या मुजोरीपुढे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही हतबल झाले आहेत.

कल्याणीनगरमधील घटनेच्या निमित्ताने महापालिकेने मुंढवा, कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन, विमाननगर, घोरपडी भागातील अनधिकृत हॉटेलवर कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी दोन रूफटॉप हॉटेलवर कारवाई केली होती. बुधवारी ६० ठिकाणी कारवाईचे नियोजन केले होते. त्यापैकी ४० ठिकाणी सायंकाळपर्यंत कारवाई झाली. यामध्ये अनवाइड, सुपरक्लब, ओरीला या तीन मोठ्या हॉटेलवरचे बांधकाम जमीनदोस्त केले; तर फ्रंट व साइड मार्जिनमधील ३० छोटे हॉटेल, सात रूफटॉप हॉटेलवर कारवाई केली. यामध्ये ५४ हजार ३०० चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले.

कारवाईमध्ये १० अभियंता, २१ पोलिस, ४५ एमएसएफ, ४० मजूर, एक जॉ-कटर, सात जेसीबी, तीन ब्रेकर, तीन गॅस कटरचा समावेश होता.

‘‘महापालिकेने ८९ अनधिकृत हॉटेलची यादी केली आहे; पण त्याशिवाय इतर अनधिकृत हॉटेलची माहिती सर्वेक्षणाद्वारे काढली आहे. त्यांच्यावर बुधवारपासून कारवाई सुरू केली आहे. या हॉटेलला यापूर्वी नोटिसा बजावल्या आहेत. मात्र कारवाईनंतर पुन्हा हॉटेल सुरू होते. त्यांच्यावर वारंवार कारवाई केली जात आहे.’’
– प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

अनविंड पब
सुपर क्लब
ओरिला पब
कणिबल
शोरमा
करीम्स हॉटेल
किनी डीली
अमाटो
अंकल्स चायनीज
नॉटी एन्जॉय कॅफे
कुलकट
फारेन टेन
टलीबार
मोक्का बार
निरंजन कवडे ओपन
मलाका स्पाईस
सिल्वर सील
रोनक सुपर मार्कट
फ्रेन्स विंन्डेा
द वायज
ब्लॅक मोचर टेटू
बीस्टो इन
केपी व्हेज
निर्माण रेस्टोरट
नंदुस पराठा
वॅटीकन
ककु
हायलॅन्ड
एकांत हॉटेल
मुस्कान वेजिटेबल अन्ड फुड सेंटर
न्यु मोबाईल फ्लावर
दि बाउटी सिझलर्स
हप्पा
परगोला
रॉक मामाज
२७ देली
द इन्सपरेषण
फ्लोअर वर्क