July 24, 2024

पुणे: जी-२० बैठकीच्या धर्तीवर शाळांमध्ये अभिरुप परिषद संपन्न, विद्यार्थ्यांनी घेतला जी-२० बैठकीचा आगळावेगळा अनुभव

पुणे, दि.१९/०६/२०२३: विद्यार्थ्यांना जी-२० परिषदेबाबत माहिती व्हावी या उद्देशाने महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत पुणे येथे होणाऱ्या जी-२० शिक्षण कार्य गटाच्या चौथ्या बैठकीच्या धर्तीवर विविध शाळांमध्ये अभिरुप परिषदेचे आयोजन करण्यात आले.  या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जी-२० बैठकीचा आगळावेगळा अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरील समस्या आणि त्यांचे निराकरण यावर चर्चा करण्यासाठी वीस देशांचे प्रतिनिधित्व केले. या परिषदेच्या निमित्ताने  जागतिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर आपले म्हणणे मांडण्याची अनोखी संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
अभिरुप परिषदेद्वारे शैक्षणीक तंत्रज्ञानावर भर, स्वत:च्या क्षमता निर्माण करणे, भविष्यातील कामाच्या संधी ओळखून त्यासंदर्भात शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देणे, मूलभूत साक्षरता अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले.  शिक्षण सर्वस्तरावर सर्वसमावेशक, गुणात्मक आणि सहयोगी बनण्यासाठी विद्यार्थ्यांना या परिषदेचा निश्चितच लाभ होणार आहे.
या परिषदेसाठी एकूण ९ शाळांची निवड करण्यात आली. यामध्ये बाल शिक्षण मंडळ, कोथरुड, साधना विद्यालय, हडपसर, राजीव गांधी ई-लर्निंग, पर्वती, द बिशप्स को-एज्युकेशन स्कुल, कल्याणीनगर, सेंट जोसेफ हायस्कूल, पाषाण, लॉयला हायस्कूल, पाषाण, विखे पाटील माध्यमिक विद्यालय, गोखलेनगर, डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, औंध व माऊट कार्मेल स्कूल, लुल्लानगर या शाळा सहभागी झाल्या.
यावेळी सर्व विद्यार्थी बैठकीच्या संकेतप्रमाणे सूट घालून एकसारख्या वेशभूषेत उपस्थित होते. विविध चर्चा सत्रात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. बैठक व्यवस्थाही जी-२० बैठकीला अनुरुप करण्यात आली होती. सदस्य राष्ट्राचा राष्ट्रध्वज त्यांचे प्रतिनिधीत्व दर्शवीत होता. सभागृहात विविध प्रकारच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात सहभागी होऊन बैठकीची प्रक्रिया जाणून घेतली. यानिमित्ताने जी-२० समूहाच्या कार्यपद्धतीविषयी प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना घेता आली.
परिषदेला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.