June 20, 2024

पुणे: दहीहंडीनिमित्त मध्यभागात वाहतूक व्यवस्थेत बदल- शहरात कडक बंदोबस्त

पुणे, ०७/०९/२०२३: दहीहंडीनिमित्त शहर तसेच उपनगरात गुरुवारी (७ ऑगस्ट) कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी दुपारनंतर बदल करण्यात येणार आहेत. शिवाजी रस्ता, मंडई भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

दहीहंडीचा उत्सव मध्यभागात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. मंडई, बेलबाग चौक, हुतात्मा बाबूगेनू चौक परिसरात मोठी गर्दी होते. शहर, तसेच उपनगरातून नागरिक माेठ्या संख्येने या भागात गर्दी करतात. मध्यभागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता भागातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी सायंकाळनंतर बदल करण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यांयी मार्गाने वळविण्यात येणार आहे. टिळक रस्त्यावरील साहित्य परिषद चौक परिसरातील दहीहंडी सोहळ्यानिमित्त या भागातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
मध्यभागातील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे- शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे (माॅडर्न कॅफे चौक) चौकातून डेक्कन जिमखाना, टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. पूरम चौकातून बाजीरावर रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्त्याने टिळक चौकातून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

मंडई परिसरातील वाहतूक बदल
बुधवार चौकमार्गे अप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्यात येणार आहे. अप्पा बळवंत चौकातुन बुधवार चौकाकडे जाणारी वाहनचालकांनी बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जावे. मंडईतील रामेश्वर चौक ते शनिपार चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी गाड्या टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जाणार आहेत.

दहीहंडीच्या उत्सवासाठी मध्यभागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मंडई भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ध्वनिवर्धकाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन मंडळांनी करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रात्री दहा वाजेपर्यंत ध्वनीवर्धकास परवानगी देण्यात आली आहे. संभाव्य घातपाती कारवाया, तसेच दागिने, मोबाइल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. – संदीपसिंग गिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक