July 24, 2024

पुणे: बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी उभारलेला स्टेज कोसळून एक ठार, तिघे गंभीर जखमी

पुणे, दि. ०४/०६/२०२३: बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी बांधण्यात आलेला स्टेज कोसळून एक जण मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. दुर्घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना लोणी काळभोर परिसरातील रामदऱ्याजवळ घडली आहे.

बाळासाहेब काशीनाथ कोळी (वय ४६, रा. निनाम पाडळी, जि. सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. दुर्घटनेत शुभम विजय लोखंडे (वय २४), मयूर प्रमोद लोखंडे (वय २५), विकास वाल्मिक ढमाळे (वय २४, रा. पिंपरी वळण, ता. राहुरी, जि. अहमदनगर) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.

लोणी काळभोर परिसरातील रामदरा परिसरात रविवारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. शर्यतीसाठी ग्रामस्थांनी स्टेज बांधला होता. रविवारी सायंकाळी लोणी काळभोर परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. जोरदार वारे वाहत असल्याने बाळासाहेब कोळी, शुभम लोखंडे, मयूर लोखंडे, विकास ढवळे आडोशाला स्टेजजवळ थांबले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्टेज कोसळला आणि आडोशाला थांबलेले कोळी, लोखंडे, ढवळे यांच्या अंगावर कोसळला.

स्टेज कोसळल्यानंतर परिसरात धावपळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब कोळी यांच्यासह शुभम लोखंडे, मयूर लोखंडे, विकास ढमाळे यांना तातडीने हडपसर भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच बाळासाहेब कोळी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.