July 25, 2024

पुणे: जमिनीच्या वादातून एकावर वार, मोटारीचे नुकसान करीत रोकड लंपास

पुणे, दि. ०४/०६/२०२३: जमिनीच्या वादातून टोळक्याने तरुणावर वार करीत त्यांच्या मोटारीचे नुकसान करुन दोन लाखांची रोकड चोरुन नेली. ही घटना २ जूनला लोणीकंदमधील कोलवडीत घडली.

पंकज सदाशिव गायकवाड, देवीदास बाळासाहेब गायकवाड, तेजस मल्हारी गायकवाड, गजानन गुलाब गायकवाड, विजय सदाशिव गायकवाड, सोमनाथ उर्फ बाजीराव रामा गायकवाड (सर्व रा. उरळी कांचन ) यांच्यासह इतर ८ ते १० जणांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सागर अशोक कुटे (वय ३४, रा. कोंढवा ) यांनी फिर्याद दिली आहे.

सागर आणि त्यांचे सासरे संभाजी गायकवाड २ जूनला मोटारीतून कोलवडीला गेले होते. त्यावेळी जमिनीच्या वादातून टोळक्याने हातात शस्त्रे, बांबू, दगड घेउन परिसरात दहशत निर्माण केली. टोळक्याने सागर आणि मनोजला शिवीगाळ करीत सागरवर वार करीत गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर मोटारीचे नुकसान करुन त्यातील दोन लाखांची रोकड चोरुन नेली. पुन्हा जागेत आला तर, जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली. हातातील शस्त्रे, बांबू हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.