पुणे, १६/०४/२०२३: खंडाळा परिसरात सुरु असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी रितेश शाम दळवी (वय २७), लतीकेश शाम दळवी (वय २३, दोघे रा. खंडाळा बाजारपेठ), सुरेश दत्तू मानकर (वय ३२), युसूफ तय्यबअली शेठीया (दोघे रा. कुणेनामाता, मावळ), मुनीर अब्दुला रहेमान बागवान (वय ५२, रा. हनुमान टेकडी, लोणावळा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई भूषण कुंवर यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खंडाळा परिसरात ऑनलाइन जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी खंडाळा तळ्याजवळ सापळा लावला. मोबाइल ॲपद्वारे आरोपी ऑनलाइन मटका जुगारावरील आकडे घेत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच मोबाइल संच तसेच २० हजार ७९० रुपये जप्त केले.
उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, हवालदार ए. बी. नायकुडे, एस. डी. शिंदे. ए. व्ही. पवार, भूषण कुंवर, ए. पी. वायदंडे आदींनी ही कारवाई केली.
More Stories
पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘दगडूशेठ’ गणपतीची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता मार्गस्थ