September 14, 2024

पुणे: अफुची शेती उध्वस्त, 1 हजार 374 अफुची झाडे जप्त

पुणे, ०२/०३/२०२३: होळकरवाडी परिसरात बेकायदेशिररित्या केल्या जात असलेल्या आफुची शेतीवर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकत ती शेती उध्वस्त केली. यावेळी 11 लाख 60 हजारांची तब्बल 1374 अफुची झाडे पोलिसांनी जप्त केली आहे. शेती करणार्‍या दोन शेतकर्‍यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राजाराम दामोदर होळकर (50, रा. होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) आणि बाळु किसन कटके (50, रा. पाटीनगर, होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी आयुक्तालयातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाया करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना होळकरवाडी परिसरात औताडेवाडी कडुन होळकरवाडी जाणार्‍या ओढ्यातील चिमणी तलावाच्या शेजारी गव्हाच्या शेतात अफुची शेती केली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.

उपलब्ध माहितीच्या आधारे लोणी काळभोर पोलिसांचे पथक होळकवाडी येथे बुधवारी दुपारी दाखल झाले. दरम्यान, बेकायदेशिररित्या केली जात असलेली शेती पोलिसांनी कारवाई करत  उध्वस्त केली. यावेळी 11 लाख 60 हजारांच्या किंमतीचे 116 किलोग्रॅम वजनाची 1 हजार 374 आफुची झाडे जप्त करण्यात आली.

होळकरवाडी येथील सर्वेनंबर 180 आणि सर्वेनंबर 183 येथे अफुच्या शेतीवर कारवाई करण्यात आली. यावेळी दोन्ही शेत मालकांना पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करत अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहे. अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, निरीक्षक सुभाष काळे, उपनिरीक्षक अमोल घोडके, अमंलदार साळुंके, विर, कुदळे, नानापुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.