October 1, 2023

पुणेकर न्यूज

पुणेकर न्यूज

पुणे: दक्षिण कमांड मुख्यालय येथे ‘वोटर मेला’चे आयोजन, लष्करातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि. १४/०३/२०२३: लष्कराचे दक्षिण कमांड मुख्यालय आणि 214- पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने लष्करी अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित ‘वोटर मेला’उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

लष्करातील अधिकारी व कर्मचारी यांची नवीन मतदार नोंदणी आणि स्थलांतरीत तसेच बदली होवून पुणे येथे कार्यरत जवानांची मतदार नोंदणी करण्यात आली. लष्करी अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांचीदेखील मतदार यादीमध्ये यावेळी नोंद करण्यात आली. पुढील महिन्यात पुणे येथील लष्कराच्या सर्वच आस्थापनांमध्ये अशा कार्यक्रमाचे आयोजन करुन अधिकाधीक जवानांची मतदार नोंदणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली.

लष्करी अधिकारी व कर्मचारी राष्ट्रीय कर्तव्यासाठी विविध क्षेत्रीय ठिकाणी कार्यरत असतात. मतदार यादीत नोंद नसल्यामुळे, स्थलातरांमुळे व बदलीमुळे मतदानाच्या हक्कापासून त्यांना वंचित रहावे लागते. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संक्षिप्त मतदार यादी पुनर्रचना मोहीम अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी यावेळी दिली. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांची नावेदेखील मतदार यादीत नोंदवावी, त्यासाठी नमुना अर्ज सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी दक्षिण कमांडचे मेजर जनरल तरनदीप सिंग बैंस यांनी सहकुटुंब मतदार यादीत मतदार म्हणून नोंदणी केली. या उपक्रमासाठी दक्षिण कमांडचे मेजर जनरल योगेश चौधरी व ब्रिगेडियर कुट्टी यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुधीर लिपारे, रविंद्र फडतरे, बाळासाहेब चव्हाण आदींनी नोंदणीचे काम पाहिले.