पुणे, ११ फेब्रुवारी २०२६: शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बुधवार पेठ परिसरात मध्यरात्री धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई रात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार स्थानिक पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या विविध पथकांचा मोठा ताफा बुधवारी मध्यरात्री बुधवार पेठेत दाखल झाला. परिसरात नाकाबंदी करून संशयितांची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी सुमारे ५० हून अधिक घरांची तपासणी केली.
कारवाईदरम्यान काही संशयित कुंटणखान्यांमध्ये महिला पोलिसांच्या पथकाने सखोल चौकशी केली. शुक्रवार पेठ पोलिस चौकी परिसरातील ठिकाणांवर महिलांची पडताळणी करण्यात आली. परिसरात देहव्यापारासाठी आलेल्या काही व्यक्तींनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.
या तपास मोहिमेत अमली पदार्थांचा वापर, महिलांना जबरदस्तीने देहव्यवसायात ढकलण्याचे प्रकार तसेच परदेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य यासंदर्भात पोलिसांनी अनेक संशयितांकडून माहिती घेतली. पुढील चौकशी सुरू असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पुणे पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि संवेदनशील भागांतील बेकायदा हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

More Stories
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना
तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रो स्थानकावरील AFC गेट्स; पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय