October 14, 2024

पुणे: राईत साकिब चौधरी टोळीविरुद्ध मोक्का

पुणे, दि. २०/०३/२०२३: कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाईचा बडगा कायम ठेवला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणार्‍या सराईत  साकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान याच्यासह ११ साथीदारांविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी मोक्कानुसार केलेली ही १८ वी कारवाई असून गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

साकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान (वय २३, रा. संतोषनगर, कात्रज ) असे टोळीप्रमुखाचे नाव आहे.  रेहान सिमा शेख ऊर्फ रेहान दिनेश शेख (वय १९ रा. खोपडेनगर, कात्रज),  अब्दुलअली जमालउददीन सैय्यद (वय  १९ रा. संतोषनगर, कात्रज), संकेत किशोर चव्हाण (वय १८ रा. कात्रज),  ऋतिक चंद्रकांत काची (वय २१ रा.  संतोषनगर,कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .

सराईत साकिबने  टोळी तयार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, दुखापत करणे, जबरी चोरी, गंभिर दुखापत करणे,   तोडफोड करणे, बेकायदेशिर शस्त्रे  बाळगणे, पोलिस आदेशाचा भंग करणे,  नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचे गुन्हे केले आहेत. संबंधित टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यावतीने अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला. प्रकरणाची छाननी करुन  टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त  संदिप कर्णीक, अपर आयुक्त  राजेंद्र डहाळे, उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, एपीआय   वैभव गायकवाड यांनी केली.