पुणे, ०४/०५/२०२३: प्रवास करून बाहेरगावावरून पुण्यातील शिवाजीनगर तसेच पुणे रेल्वे स्टेशन याठिकाणी आलेल्या प्रवाशांना अज्ञात चोरट्यांकडून मारहाण करून लुटमारीचे प्रकार वाढल्याचे पाहावयास मिळत आहे. शिवाजीनगर येथे एका प्रवाशाला जबरदस्ती करून तीन ते चार जणांच्या टोळक्याने लुटले असून पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील अठरा वर्षाच्या तरुणास बेदम मारहाण करून फोन पे द्वारे आरोपींनी पैसे घेतल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर आणि बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.
पहिल्या घटनेत, पुणे रेल्वे स्टेशन जवळील पुणे -नगर हायवे लगत खाजगी रस्त्यावर संदेश सुहास अवताडे( वय -18 ,राहणार – शिवाजीनगर, पुणे) हा तरुण दोन मे रोजी रात्री अकरा वाजता रस्त्याने पायी जात होता. त्यावेळी अज्ञात तीन जणांनी त्यास रिक्षामध्ये बळजबरीने बसवून संबंधित आडबाजूला घेऊन जाऊन जबरदस्तीने हाताने, पायाने व लोखंडी रोडने, चेहऱ्यावर ,डोक्यात ,मानेवर व पाठीवर मारहाण केली. त्यानंतर त्याच्या जवळील मोबाईल मधील फोन पे ॲपचा पिन क्रमांक त्याच्याकडून घेऊन, त्याद्वारे आरोपींनी ७१० रुपये जबरदस्तीने घेतले आहेत.याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत आफताब शेख व कॅरी उर्फ किरण खरात या दोन आरोपींना अटक केली असून त्यांचा फरार साथीदार आशिष मापारी याचा शोध पोलीस घेत आहे.
दुसऱ्या घटनेत, शिवाजीनगर येथील शिवाजी पुतळा चौकात अभिजीत दत्तात्रय गाडेकर( वय- 30 ,राहणार -सिंहगड कॉलेज परिसर, आंबेगाव बुद्रुक ,पुणे) हा 13 एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजता ट्रॅव्हल्सने गावावरून आल्यानंतर बसने उतरलेला होता. त्यावेळी घरी जात असताना त्याला अज्ञात तीन ते चार अनोळखी चोरट्यांनी मारहाण करून त्याच्या बॅग मधील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, सहा पेन ड्राईव्ह, चार कॅमेऱ्यांचे कार्ड ,आधार कार्ड, पॅन कार्ड ,एसबीआय बँकेचे पासबुक ,पाकिटातील रोख रक्कम जबरदस्तीने चोरी करून दिली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहे.
More Stories
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला: महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांचे निर्देश
सिंबायोसिस तर्फे “सिम-इमर्ज २०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन