May 19, 2024

पुणे आरटीओ वाहन निरीक्षकांच्या लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवत फसवणूक..!

पुणे, १७/०६/२०२३: पुणे आरटीओ कार्यालयातील एका वाहन निरीक्षकांच्या लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवत त्याआधारे सिटीझन पोर्टल अॅपमध्ये प्रवेशकरून ९ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आरटीओ निरीक्षकांच्या तपासणीत ही बाब समोर आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरटीओच्या ४५ वर्षीय महिला वाहन निरीक्षक यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून एका आयपी ऑड्रेस धारकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओकडून दररोज शेकडो वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. त्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली आहे. वाहन निरीक्षकांना सिटीझन पोर्टलच्या माध्यमातून ते प्रमाणपत्र द्यावे लागते. हे पोर्टल सुरू करण्यासाठी दररोज सकाळी एकवेळा संबंधित वाहन निरीक्षकांना लॉगिन करावे लागते. त्यानंतर दिवसभर त्यावरून कामकाज सुरू राहते. दरम्यान, लॉगिन केले असता त्याचा पासवर्ड हा संबंधित मोबाईल क्रमांकावरच येतो. तो पासवर्ड टाकल्यानंतर सिटीझन पोर्टल सुरू होते व कामकाज सुरू होते. दरम्यान, तक्रारदार यांचा लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवून त्याआधारे सिटीझन पोर्टल सुरू केले. तर त्यातून एन्ट्री, ऑप्रुव्हल व व्हेरीफाय प्रिंट काढून ९ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र परस्पर दिले.

दरम्यान, वाहन निरीक्षकांकडून आपण दिलेल्या वाहनांची नोंद ठेवण्यात येते. त्याची पडताळणी देखील अधून-मधून केली जाते. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी पाहणी केली असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याबाबत पुणे आरटीओंना संबंधित घटनेची माहिती विचारली. त्यात वाहन निरीक्षकांना बसण्यास स्वतंत्र कॅबिन नाहीत. एका हॉलमध्ये बसून त्यांचे कामकाज चालते. त्यामुळे त्यांचा पासवर्ड व लॉगिन आयडी टाकत असताना तो मिळवून त्याद्वारे फसवणूक केली असावी अशी शक्यता असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी त्यानूसार, गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते या करत आहेत.