May 20, 2024

पुणे: सदाशिव पेठेत तरुणीचा जीव वाचविणाऱ्या तरुणांना मुख्यमंत्र्यांकडून १५ लाखांचे बक्षीस, जखमी तरुणीला पाच लाख रुपये

पुणे, ०१/०७/२०२३: सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या हल्लेखोराला राेखून तरुणीचे प्राण वाचविणारे लेशपाल जवळगे, हर्षद पाटील, दिनेश मडावी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. जखमी तरुणीला मुख्यमंत्री शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत दिली आहेत. सारसबाग परिसरातील शिवसेना भवन कार्यालयात पक्षाच्या प्रवक्त्या डाॅ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते तरुणीचे प्राण वाचविणारे महाविद्यालयीन तरुण लेशपाल जवळगी, हर्षद पाटील, दिनेश मडावी यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले.

आर्थिक मदतीचा तरुणांना शिक्षणासाठी उपयोग होईल. त्यांना पाठबळ मिळेल, असा संदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठविला आहे. आरोपीने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. जखमी झालेल्या तरुणीच्या मित्राला शिवसेनेकडून पंचवीस हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. शस्त्रक्रियेचा खर्च शिवसेनेकडून करण्यात येणार आहे.

त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. एकतर्फी प्रेमातून तरुणींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्यात याव्यात. महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे डाॅ. वाघमारे यांनी सांगितले. शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद तथा नाना भानगिरे, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, युवासेना सचिव किरण साळी, महिला आघाडी अध्यक्ष लिना पानसरे, पूजा रावेतकर, निलेश घारे, प्रमोद प्रभुणे आदी यावेळी उपस्थित होते.