पुणे, ०१/०७/२०२३: कोंढवा भागातील वडाची वाडी परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने पाच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीस्वार वडील जखमी झाले आहेत. या प्रकरणी मोटारचालकाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गाथा इंद्रजीत यादव (वय ५ ) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार इंद्रजीत बंडोपंत यादव (वय ३९, रा. ॲरोनेस्ट सोसायटी, वडाचीवाडी ) जखमी झाले आहेत. या प्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण जालिंदर मांढरे (वय ३२, रा. वडाचीवाडी, उंड्री, कोंढवा) यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रजीत यादव ग्रामसेवक आहेत. यादव आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी गाथा दुचाकीवरुन निघाले होते.काळुबाई मंदिरासमोर भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार यादव आणि त्यांची मुलगी गाथा यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान गाथाचा रुग्णालयात मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटारचालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
More Stories
पुणे महापालिकेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
भाजपच्या मंडळ अध्यक्षांच्या निवडीत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचे वर्चस्व
मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार