December 14, 2024

पुणे: बँक कर्मचारी असल्याची बतावणीतीन लाखांची रोकड चोरून चोरटा पसार, लष्कर भागातील घटना

पुणे, १४/०६/२०२३: लष्कर भागातील एका बँकेतून रोकड काढणाऱ्या खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याची चोरट्याने तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत एका खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ढोले-पाटील रस्त्यावरील एका खासगी कंपनीत कर्मचारी आहेत. कंपनी व्यवस्थापकाने त्यांना बँकेतून तीन लाख रुपये काढून आणण्यासाठी धनादेश दिला होता. रोकड काढण्यासाठी ते लष्कर भागातील जनरल थिमय्या रस्त्यावर असलेल्या खासगी बँकेत गेले होते. त्या वेळी बँकेतील राेखपाल कक्षाजवळ चोरटा थांबला होता. खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याने रोखपालाकडून रोकड घेतली. पिशवीत रोकड भरत असताना चोरटा त्यांच्याजवळ थांबला.

त्याने बँक कर्मचारी असल्याची बतावणी केली. नोटांच्या बंडलावर पेन्सीलने केलेल्या खुणा आहेत, तसेच बंडलावर डाग पडल्याची बतावणी केली. रोखपालाने नोटांचे बंडल परत मागितले आहे, अशी बतावणी केली. तक्रारदाराला चोरटा बँक कर्मचारी वाटल्याने त्याने तीन लाखांची रोकड असलेले बंडल चोरट्याच्या हातात दिले. चोरटा बंडल घेऊन पसार झाला. काही वेळाने तक्रारदाराच्या लक्षात हा प्रकार आला. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.