July 22, 2024

पुणे: लाचखोरीच्या आरोपातील तीन पोलीस हवालदार निलंबित

पुणे, १४/०६/२०२३: अपघाताची तक्रार दाखल करून घेण्यासाठी १३ हजार रूपये लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या येरवडा पोलिस ठाण्यातील तीन पोलीस हवालदारांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिले.

हवालदार राजेंद्र रामकृष्ण दीक्षित, हवालदार जयराम नारायण सावळकर, हवालदार विनायक मुधोळकर अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अपघाताची तक्रार दाखल करून घेण्यासाठी एका टुरिरस्ट व्यावसायिकाकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी मध्यरात्री सापळा लावून लाच घेणारे पोलीस हवालदार दीक्षित यांना पकडले होते. लाच घेण्यासाठी हवालदार सावळकर, मुधोळकर यांनी सहाय केल्याचे उघडकीस आले होते. अशोभनीय वर्तन करून पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणे, तसेच बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेऊन तिघांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले.