May 18, 2024

पुणे: साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक, पश्चिम बंगालमधून एकास अटक

पुणे, १६/०७/२०२३: ऑनलाइन आर्थिक सेवा देणाऱ्या इझी पे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या देशभरातील ६५ प्रतिनिधींनी साडेतीन कोटी रुपयांची फसणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने फसवणूक प्रकरणात एकास पश्चिम बंगालमधून अटक केली.

अंकितकुमार अशोक पांडे (वय २०, रा. नवादा, बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इझी पे कंपनीचे येरवडा भागात कार्यालय आहे. इझी पे कंपनीकडून ऑनलाइन पेमेंट सुविधा दिली जाते. या कंपनीकडून देशभरात अधिकृत प्रतिनिधींची (एजंट) नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीची फसवणूक करण्यासाठी ६५ प्रतिनिधींनी संगनमत केले होते. कंपनीची तीन कोटी ५२ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. कंपनीच्या खात्यातून पैसे काढून घेण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार देण्यात आली होती.

कंपनी व्यवस्थापनाकडून शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याकडून सुरू करण्यात आला. तेव्हा पांडे दिल्लीत असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांचे पथक दिल्लीत पोहोचले. तेव्हा पांडे तेथून पसार झाल्याचे लक्षात आले. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो राहण्याची ठिकाणे बदलत होता. पांडे पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात मामरा दुर्गापूर गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त अप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, उपनिरीक्षक तुषार भोसले, राजकुमार जाबा, बाबासाहेब कराळे, नवनाथ जाधव, निलेश लांडगे, बापू लोणकर यांनी ही कारवाई केली.