October 13, 2024

पुणे: आळे फाटा परिसरात मोटारीच्या धडकेने तीन शेतमजुरांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

पुणे, २५/०९/२०२३: कल्याण-नगर मार्गावर आळेफाटा परिसरात भरधाव मोटारीने पाच परप्रांतीय शेतमजुरांना धडक दिली. अपघातात तिघांचा मृत्यू झाला. अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जगदीश महेंद्रसिंह डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण मूळचे मध्य प्रदेशातील आहेत. दिनेश जाधव, विक्रम तारोले गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डावर, मांजरे, तारोले, जाधव शेतमजूर आहेत. ते मजुरीसाठी आळेफाटा परिसरात आले होते. रविवारी रात्री (२४ सप्टेंबर ) साडेआठच्या सुमारास ते कल्याण-नगर मार्गावरील कठेश्वर पुलावरुन निघाले होते. पुलाच्या परिसरात अंधार होता. भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली.

अपघातात डावर, मांजरे, तारोले, जाधव गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन कांडगे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मजुरांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच डावर, मांजरे, तारोले यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.