October 15, 2025

पुणे: १२ जूनला कोथरूड, नगर रस्ता परिसरात पाणी बंद

पुणे, ६ जून २०२५: पुणे महापालिकेच्या वतीने तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी १२ जून रोजी वारजे जलशुद्धीकरण केंद्र आणि भामा-आसखेड जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. त्यानंतर १३ जून रोजी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

या देखभाल कामांमध्ये वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीला नवीन जोडणी देण्याचे आणि व्हॉल्व्ह बसवण्याचे काम केले जाणार आहे. तसेच भामा-आसखेड योजनेतून येणाऱ्या पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी चाचणी घेतली जाणार आहे.

या कामांमुळे कोथरूड आणि नगर रस्त्याच्या परिसरासह पाषाण, बावधन, भुसारी कॉलनी, बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, धानोरी, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, लोहगाव आणि परिसरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

संबंधित भागांतील रहिवाशांनी पाणी साठवून ठेवावे आणि महापालिकेच्या वेळापत्रकानुसार आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.