October 14, 2025

पुणे: शिवाजीनगर, सदाशिव पेठेचा पाणी पुरवठा विस्कळीतच

पुणे, २५ मार्च २०२५: दांडेकर पूल येथे जलवाहिनी फुटल्यानंतर आज (ता. २५) दिवसभर दुरुस्तीचे काम सुरु असल्याने पाणी पुरवठा विस्कळित होता. संध्याकाळनंतर काम पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा शिवाजीनगर व सदाशिव पेठ परिसरातील पाणी पुरवठा उद्या (ता. २६ ) सुरळीत होईल, नागरिकांच्या सोईसाठी जास्त वेळ पाणी सोडले जाईल असे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पर्वती जलकेंद्रावरून शिवाजीनगर भागाला व सदाशिव पेठेला पाणी पुरवठा करण्यासाठी १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी आहे. ही ५५ वर्ष जुनी जलवाहिनी सोमवारी (ता. २४) रात्री साडे नऊच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ फुटली. यामुळे स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पाणी वाहत होते, पाण्याच्या दबावामुळे या ठिकाणचा रस्ता खचला आहे. ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने काम सुरु केले. यासाठीचे काही साहित्य हे भोसरीवरून येण्यास बराच विलंब झाल्याने संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. हे साहित्य आल्यानंतर रात्री उशिरा जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे.

शिवाजीनगर भागातील डेक्कन, आपटे रस्ता, गोपाळकृष्‍ण गोखले रस्ता, सेनापती बापट रस्ता परिसर, मॉडेल कॉलनी, जंगली महाराज रस्ता आदी भागातील पाणी पुरवठा आज दुपारी विस्कळित होता. गेल्या काही दिवसांपासून या भागात अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिक त्रस्त असताना आता जलवाहिनी फुटल्याने त्यात आणखी भर पडली आहे.
पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, दांडेकर पूल येथील फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर शिवाजीनगर, सदाशिव पेठेत काही काळ जास्त पाणी सोडले जाईल. या भागात आज पाणी नसल्याने ज्यांनी मागणी केली त्यांना मोफत टँकर पुरविण्यात आले आहेत. तसेच याठिकाणचा रस्ता खचल्याने पथ विभागाला त्वरित रस्ता दुरुस्त करण्यास सांगण्यात आले आहे.

नव्या जलवाहिनीचा अजून वापर नाही
सदाशिव पेठ, शिवाजीनगर भागाला पाणी पुरवठा करणारी ही जलवाहिनी ५५ वर्ष जुनी आहे. समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नव्या जलवाहिनीचा वापर प्रशासनाने अजून सुरु केलेला नाही. त्याबाबत विचारले असता शिवाजीनगर भागासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या टेकडीवर बांधल्या जाणाऱ्या टाकीतून पाणी दिले जाणार आहे. हे काम अद्याप अपूर्ण आहे. टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर ५५ वर्ष जुन्या जलवाहिनीचा वापर बंद होईल.