पुणे, दि. १५/०५/२०२३ – कामावर जाण्याआधी पत्नीने जेवणाचा डबा न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीला दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यामुळे बेशुद्ध होउन खाली पडल्यामुळे नातलगांनी तिला ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पतीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. ही घटना १३ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास उंड्रीतील होले वस्तीवर घडली.
शीतल सोमनाथ पांडागळे (वय २७, रा. उंड्री) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमनाथ महादेव पांडागळे (वय ३०) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ बिगारी काम करतो. त्याची शीतलसोबत ओळख झाल्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन लग्न केले होते. त्यानंतर ते मागील काही महिन्यांपासून उंड्रीतील होले वस्ती परिसरात भाडोत्री खोलीत राहत होते. १३ मे रोजी सोमनाथ कामावर जाताना शीतलने त्याला जेवणाचा डबा बनवून दिला नाही. त्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली. त्याच रागातून त्याने शीतलला दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत शीतलला काही वेळात फिट आल्यामुळे ती बेशुद्ध पडली.
जवळील नातलगांनी तिला ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र ,उपचारापुर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या अंगावर मारहाणीच्या खूना दिसून आल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद केला.
More Stories
संरक्षण मंत्रालयाच्या पुणे येथील दक्षिण विभागाच्या जनसंपर्क अधिकारी पदी अंकुश चव्हाण यांची नियुक्ती
डेक्कन कॉलेज पद्व्युत्तर आणि संशोधन संस्था, अभिमत विद्यापीठ, पुणे येथे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम उत्साहात पार पडला.
वंचित मुलांसाठी हक्काचे घर निर्माण करून देणारे कावेरी व दीपक नागरगोजे यांची सामान्य ते असामान्य कार्यक्रमात होणार विशेष मुलाखत