October 14, 2025

राहुल गांधी यांची शुक्रवारी पुण्यात सभा

पुणे, २ एप्रिल २०२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आता पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह जिल्हयातील चार उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची शुक्रवारी ३ एप्रिल रोजी पुण्यात सभा होणार आहे. मोदी यांनी ‘शहजादे’ म्हणून केलेल्या टीकेला राहुल गांधी या सभेतून काय उत्तर देणार याबाबत उत्सुकता लागू राहिली आहे.

गांधी यांचे उद्या दुपारी तीन वाजता पुण्यात आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाजवळील (आरटीओ) एसएसपीएमएस या संस्थेच्या मैदानात ते सभेला संबोधित करणार आहेत. या सभेसाठी पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यात झाली. या सभेत राहुल गांधी यांचा ‘शहजादे’ असा उल्लेख करून धर्माच्या आधारावर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा आणि वारसाकर लावून संपत्तीचे मुस्लिमांमध्ये वाटप करण्याचा आरोप कॉंग्रेसवर केला होता. मोदी यांनी केलेल्या आरोपाला राहुल गांधी काय उत्तर देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सुरक्षा व्यवस्थेचा खुर्च्यांना फटका

या सभेच्या निमित्ताने कॉंग्रेसने शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. मैदानाची आसनक्षमता चाळीस ते पन्नास हजार खुर्च्यांची आहे. परंतु सुरक्षेच्या कारणामुळे विशेष सुरक्षा दलाने व्यासपीठासमोरील बाजूस मोठी जागा (डी) मोकळी सोडण्यास सांगितले. त्यामुळे जवळपास १२ ते १५ हजार खुर्च्या कमी कराव्या लागणार आहेत. परिणामी तीस हजारच खुर्च्या मांडण्यात येणार आहे. तर सभेला येणाऱ्यांसाठी कैलाश स्मशानभूमी लागतच्या पुढील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. या सभेसाठी मैदानात चार एलईडी लावण्यात येणार आहेत.

‘एसएसपीएमएस’ संस्थेचे पहिल्या क्रमांकाचे प्रवेशद्वार आणि ‘आरटीओ’नजीक ‘सुदर्शन केमिकल्स’मधून मतदार व कार्यकर्त्यांना सभास्थळी प्रवेश करता येणार आहे, तर मधला रस्ता राहुल गांधी यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. उन्हाची काहिली वाढली असल्याने, नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उष्माघाताचा त्रास झाल्यास तातडीने उपचार करण्यासाठी पक्षाच्या डॉक्टर सेलचे तज्ज्ञ डॉक्टर दक्ष राहणार असून, रुग्णवाहिकाही तैनात राहणार आहेत, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.