पिंपरी-चिंचवड, दि. 1 एप्रिल 2026: पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पवना धरणातून बंद पाईपलाईन प्रकल्पाचे ९०% भूसंपादन पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्पपूर्तीसाठी निधी देऊन तातडीने गती देण्याची मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगरसेवक राहुल कलाटे यांनी आज (१ एप्रिल) मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. तत्पूर्वी पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेत त्यांनी हा विषय अतिशय गांभीर्याने उपस्थित केला होता.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा पवना थेट बंद पाईपलाईन योजनेसाठीचे ९०% भूसंपादन पूर्ण झाले असून त्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात १८६ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र एकूण रकमेच्या २५% तरतूद नसेल तर पुन्हा टेंडर निघायला अडचण येऊन प्रकल्प प्रलंबित होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही वस्तुथिती ही कलाटे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत मांडली होती.
स्थानिक पातळीवर योग्य निर्णय न झाल्यास प्रसंगी मुख्यमंत्र्यांना याबद्दल विनंती करेन असेही ते सभागृहात म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर कलाटे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे समजते.
“पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरातील पाणीटंचाई विषय अत्यंत महत्वाचा असून “टँकर लॉबी” विरोधात नागरिकांमधूनही नाराजीचा सूर वाढताना दिसतो. पवना बंद पाईपलाईन प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम व नियमित होण्यास मदत होईल. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच प्रकल्पाला गती देतील याबद्दल खात्री आहे.”
– राहुल कलाटे, नगरसेवक, पिंपरी चिंचवड मनपा
आपल्या पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून रोज सुमारे पाचशे दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. नैसर्गिक प्रवाहाद्वारे रावेत बंधाऱ्यापर्यंत येणारे हे पाणी उपसा करून जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. त्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र या पद्धतीमुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होत असून प्रदूषित पाणी मिक्स होऊन पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतोय. पवना थेट बंद पाईपलाईन प्रकल्पामुळे अंदाजे १०० एमएलडी पाण्याची बचत होऊन तेवढे अतिरिक्त पाणी पिण्यासाठी उपलब्ध होऊ शकते. शिवाय सुमारे १५ वर्ष प्रकल्प प्रलंबित राहिल्याने प्रकल्पाचा खर्च वाढत जाऊन ३०० कोटींहून १२५६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची स्थिती आहे. त्यामुळे शासन पातळीवर मुख्यमंत्र्यांनी यात प्राधान्याने लक्ष घालून निधीची तरतूद तातडीने करावी आणि प्रकल्पाला योग्य तो प्रशासकीय हस्तक्षेप करून गती द्यावी अशी मागणी राहुल कलाटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
काय आहे पवना जलवाहिनी प्रकल्प
पाणी गळती रोखण्यासाठी आणि पुरेसे स्वच्छ पाणी नागरिकांना मिळावे यासाठी उपाय म्हणून पवना धरणातून निगडी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुमारे ३४.७१ कि.मी. लांबीची थेट भूमिगत बंद जलवाहिनी उभारण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला होता. या प्रकल्पामुळे अंदाजे १०० एमएलडी पाण्याची बचत होऊन तेवढे अतिरिक्त पाणी शहरवासीयांना उपलब्ध होऊ शकते.

More Stories
पवना धरणातून पिंपरी चिंचवडला १०० ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणी मिळणार – आमदार शंकर जगताप
सक्षम महिलांच्या कर्तृत्वाला सलाम! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उत्कृष्ट महिला बचत गटांचा भव्य सन्मान
हिंजवडी आयटी ‘फ्रेशर्स’ फसवणूक प्रकरणी एसआयटी स्थापन; मुख्यमंत्र्यांचे आदेश