July 25, 2024

एमएसएलटीए – पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 14 वर्षाखालील चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीत सक्षम भन्साळी, आरोही देशमुख यांना विजेतेपद

पुणे, 22 एप्रिल 2023: अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित व एमएसएलटीए, पीएमडीटीए, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 14 वर्षाखालील चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात सक्षम भन्साळी याने, तर मुलींच्या गटात आरोही देशमुख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. दुहेरीत मुलांच्या गटात सूर्या काकडे व सनत कडले यांनी, तर मुलींच्या गटात स्वानिका रॉय व श्रावी देवरे या जोडीने विजेतेपद पटकावले.

पाषाण रोड येथील सीपीआर व एनसीएल टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात आठव्या मानांकित सक्षम भन्साळी याने नमिश हुडचा 6-3, 6-4 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना 2तास 10मिनिटे चालला. सामन्यात सक्षमने सुरेख सुरुवात करत दुसऱ्याच गेममध्ये नमिशची सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये सक्षमने वर्चस्व राखत सहाव्या गेममध्ये नमिशची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये 4-4 अशी बरोबरी असताना दहाव्या गेममध्ये सक्षमने नमिशची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून विजय मिळवला. सक्षम हा इंदिरा नॅशनल शाळेत नववी इयत्तेत शिकत असुन एनसीएल टेनिस कोर्ट येथे प्रशिक्षक अनिकेत वाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

मुलींच्या गटात अंतिम फेरीत सातव्या मानांकित आरोही देशमुख हिने दुसऱ्या मानांकित रीशिता पाटीलचा 6-3, 76-(4) असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 3तास 30मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये चौथ्या गेममध्ये रिशिताची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये आरोही 5-2 अशा फरकाने आघाडीवर असताना रिशिताने जोरदार कमबॅक करत नवव्या गेममध्ये तिची सर्व्हिस भेदली व सामन्यात बरोबरी साधली. अखेर टायब्रेकमध्ये आरोहीने वरचढ खेळ करत हा सेट 7-6(7-4) असा जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. आरोही अभिनव विद्यालय इंग्लिश मिडीयम शाळेत आठवी इयत्तेत शिकत असुन एम टेनिस अकादमीत प्रशिक्षक केतन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

दुहेरीत मुलींच्या गटात अंतिम फेरीत स्वानिका रॉय व श्रावी देवरे यांनी अस्मी टिळेकर व सम्राज्ञी दळवी यांचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळविले. मुलांच्या गटात सनत कडले व सूर्या काकडे या जोडीने सक्षम भन्साळी व स्वर्णिम येवलेकर यांचा 6-1, 7-6(5) असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकवला. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तीपत्रक व 25 एआयटीए गुण, तर उपविजेत्या करंडक, प्रशस्तीपत्रक व 20 एआयटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक अनिकेत वाकणकर, निकिता वाकणकर, निलेश गायकवाड, अक्षय भावसार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा निरीक्षक प्रणव वाघमारे, सरदार सिंग ठाकुर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: मुली:
आरोही देशमुख(7)वि.वि.रीशिता पाटील(2)6-3, 7-6(4);

मुले: सक्षम भन्साळी(8)वि.वि.नमिश हुड 6-3, 6-4;

दुहेरी: मुली: अंतिम फेरी: स्वानिका रॉय/ श्रावी देवरे(4) वि.वि.अस्मी टिळेकर/सम्राज्ञी दळवी 6-2, 6-2;

मुले: सनत कडले/सूर्या काकडे(1) वि.वि.सक्षम भन्साळी/स्वर्णिम येवलेकर(3) 6-1, 7-6(5).