पुणे, 4 मार्च 2023 ः ज्येष्ठ टेनिस प्रशासक आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आनंद तुळपुळे यांचे शनिवारी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी मृणाल, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
तुळपुळे हे पुण्यातील आघाडीचे टेनिस प्रशिक्षक आणि प्रशासक होते. टेनिस विश्वातील सॅटेलाईट्स, फ्युचर्स अशा प्रमुख स्पर्धांसह त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यांना टेनिस प्रशासनातील ४५ वर्षांचा अनुभव होता. डेक्कन जिमखान्यावर झालेल्या अनेक डेव्हिस चषक स्पर्धेच्या यशस्वी संयोजनात त्यांचा प्रमुख वाटा होता.
तुळपुळे यांनी तीन दशकांहून अधिक काळ डेक्कन जिमखान्याचे प्रतिनिधीत्व केले. डेक्कन जिमखान्याचे सरचिटणीस म्हणून काम करताना त्यांनी क्लबमध्ये शिस्त आणि स्थिरता आणली. राज्य टेनिस संघटनेचे संयुक्त सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुढे त्यांची राज्य संघटनेवर आजीवन उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
भारताची माजी अव्वल मानांकित आणि फेड चषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी राधिका ही त्यांची मुलगी होय.
राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तुळपुळे यांचे टेनिस मधील कार्य महत्त्वपूर्ण होते. ते कधीच विसरता येणार नाही, अशा शब्दांत अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिव सुंदर अय्यर यांनी श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
More Stories
राज्यात काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर तर काही ठिकाणी १ नोव्हेंबर रोजी साजरे करता येणार लक्ष्मीपूजन
निवडणूक निरीक्षक उमेश कुमार यांनी घेतला हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या कामकाजाचा आढावा
दिव्यांग मतदारांना उर्त्स्फूतपणे मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन