September 10, 2024

महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी श्रीराम कॅपिटल्स मुख्य प्रायोजक

पुणे, दि. 17 जुन 2023 – आर्थिक सेवा आणि विमा क्षेत्रातील अग्रगण्य श्रीराम समूहातील श्रीराम कॅपिटल्स प्रा. लि. या आघाडीच्या कंपनीने महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) टी – 20 क्रिकेट स्पर्धेचे मुख्य प्रायोजक बनण्याचा मान मिळविला आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटना आणि श्रीराम कॅपिटल्स यांच्यातील सहकार्यामुळे राज्यातील क्रिकेटक्षेत्रात मैलाचा दगड प्रस्थापित झाला असून नव्या युगाची सुरुवात होत आहे.
 
व्यावसायिक टी-20 असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगचे हे पहिले वर्ष असून राज्यातील, तसेच देशभरातील आघाडीचे खेळाडू यात सहभागी होत आहेत. उदयोन्मुख आणि गुणवान खेळाडूंना व्यावसायिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एमपीएल हे उत्तम व्यासपीठ आहे. श्रीराम कॅपिटल्सच्या साहाय्यामुळे एमपीएल ही देशातील एक अग्रगण्य प्रीमियर लीग बनू शकणार आहे.
 
या कराराची घोषणा करताना श्रीराम कॅपिटल्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. व्ही रवी म्हणाले, की एमपीएलचे मुख्य प्रायोजक म्हणून भूमिका स्वीकारणे हा आमच्यासाठी मोठाच सन्मान आहे. एमपीएलबरोबर संबंध जुळून आल्यामुळे देशातील क्रीडाक्षेत्राप्रती आमची बांधिलकी आणि गुणवान खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आमचे धोरण आणखी पुढे जाणार आहे. महाराष्ट्राला क्रिकेटक्षेत्रात मोठी परंपरा असून तळागाळाच्या स्तरापासून युवा क्रिकेटपटूंना पाठिंबा देण्याच्या प्रवासामुळे आमच्या मोहिमेला बळ मिळणार आहे.
 
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, की श्रीराम कॅपिटल्स यांना महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धेचे मुख्य प्रायोजक म्हणून स्वीकारताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या भागीदारीमुळे या स्पर्धेचा केवळ दर्जाच वाढणार नसून महाराष्ट्रातील क्रिकेटच्या प्रसाराला साहाय्य होणार आहे. राज्यातील गुणी क्रिकेटपटूंसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच देशभरातील क्रिकेटशौकिनांच्या आनंदात भर घालण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.
 
या भागीदारीमुळे श्रीराम कॅपिटल्स यांना मैदानावर, तसेच मैदानाबाहेरही त्यांच्या जाहिराती व मार्केटिंगसाठी विशेष संधी मिळणार आहे. तसेच डिजिटल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांना मोठे व्यासपीठ मिळणार असून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील क्रिकेटशौकिनांपर्यंत पोहोचण्याची संधी त्यांना लाभणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
 
महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धा ही खेळाडू व प्रेक्षक या दोघांसाठी क्रिकेटमधील आनंद आणि थरार अनुभवण्याची अनोखी संधी ठरणार आहे. सर्वोत्तम दर्जाचे खेळाडू, चुरशीची स्पर्धा आणि रोमांचकारी वातावरण यामुळे एका आगळ्यावेगळ्या अनुभवाचा आनंद क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे..