March 16, 2026

हिंजवडी आयटी ‘फ्रेशर्स’ फसवणूक प्रकरणी एसआयटी स्थापन; मुख्यमंत्र्यांचे आदेश

पिंपरी-चिंचवड, १० मार्च २०२६: हिंजवडी आयटी पार्कमधील ‘फ्लायनॉट सास प्रा. लि.’ या कंपनीकडून शेकडो अभियांत्रिकी पदवीधरांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नानंतर सरकारने ही कारवाई जाहीर केली.

विधानसभेत प्रश्न क्रमांक २७८६८ द्वारे आमदार जगताप यांनी या प्रकरणाचा मुद्दा मांडत हिंजवडी आयटी पार्कमधील ‘फ्लायनॉट सास प्रा. लि.’ कंपनीकडून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची झालेली फसवणूक सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या पाठपुराव्याची दखल घेत राज्य सरकारने तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

माहितीनुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये संबंधित कंपनीने विविध कन्सल्टन्सींच्या माध्यमातून फ्रेशर्स इंजिनिअर उमेदवारांना मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवले. उमेदवारांना प्रशिक्षण आणि नियुक्तीपूर्व प्रक्रिया असल्याचे सांगून प्रत्येक विद्यार्थ्याकडून १ लाख ते २.५० लाख रुपयांपर्यंतची आगाऊ रक्कम कंपनीच्या खात्यावर भरून घेण्यात आली.

त्यानंतर काही महिन्यांपर्यंत उमेदवारांकडून ऑनलाइन काम करून घेतले गेले. मात्र प्रत्यक्षात पगार देण्यात आला नाही. पुढे पात्रता परीक्षा किंवा मुलाखतीत अपयशी ठरल्याचे कारण देत अनेक उमेदवारांना कंपनीत रुजू करून घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे शेकडो तरुणांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात उपेश रंजीत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत ३५७ पीडित विद्यार्थ्यांची ६ कोटी ४९ लाख ९६ हजार ७३१ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करत असतानाच प्रशासनाने त्यांच्या मालमत्तेवरही टाच आणण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत आरोपींची १ कोटी २७ लाख २५ हजार ७८० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये सुमारे ४८ लाख २५ हजार ७८० रुपयांच्या जंगम मालमत्तेचा आणि ७९ लाख रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेल्या या मालमत्तेच्या माध्यमातून पीडित विद्यार्थ्यांना रक्कम परत मिळवून देण्यासाठी एसआयटीमार्फत पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना आमदार शंकर जगताप म्हणाले की, आयटी क्षेत्रात प्रवेश करण्याच्या स्वप्नाने आलेल्या तरुणांची अशा प्रकारे फसवणूक होणे अत्यंत गंभीर आहे.

“या प्रकरणाचा तपास केवळ कागदोपत्री न राहता प्रत्येक पीडित विद्यार्थ्याला त्याचे हक्काचे पैसे परत मिळावेत आणि अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई व्हावी, हीच माझी मागणी आहे. एसआयटी स्थापन झाल्यामुळे आता या प्रकरणाचा छडा लागेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.